“विभागाशी संबंधित बैठक माझ्या अध्यक्षतेखालीच घ्या”, संजय शिरसाट यांचे माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र

मुंबई : शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप नेत्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिले आहे. सामाजिक न्याय विभागातील कामकाजासंदर्भातील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याच्या आरोपावरुन संजय शिरसाट यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं आहे.
सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका मिसाळ यांनी परस्पर घेतल्याने कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट नाराज झाले. मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास, बैठक माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी असे पत्र लिहिलं आहे.
आमदारांच्या पत्रावरून मिसाळ यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिले होते, मात्र याबाबत शिरसाट यांना कल्पना नव्हती. या बैठकांची माहिती शिरसाट यांना मिळाल्यानंतर शिरसाट यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
या पूर्वीही सामाजिक न्याय विभागातून लाडक्या बहिणीसाठी पैसे वळवल्याने शिरसाटांनी नाराजी व्यक्त केली होती. आता शिरसाटांच्या विभागातील बैठकाही राज्यमंत्री घेऊ लागल्याने भाजपकडून सेनेच्या मंत्र्यांना गृहित धरले जात आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.





