Pune: विक्रमी मताधिक्याने विजयी होणार; आमदार माधुरी मिसाळ यांचा प्रचार सांगता फेरीत दावा

पुणे – पर्वती मतदारसंघाच्या पायाभूत तसेच नियोजनबद्ध विकासासाठी गेली पंधरा वर्षे सातत्याने अवितरपणे काम केले. त्यामुळेच पक्षाने तसेच मतदारांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात मी उतरले आहे. मतदारांच्या प्रेम आणि विश्वासाच्या बळावर पुण्यात विक्रमी मताधिक्याने आपण चौथ्यांदा आमदार होऊ, असा विश्वास पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मिसाळ यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचार फेरी काढली. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधत आपल्या विजयाची खात्री व्यक्त केली. दीपक मिसाळ, श्रीकांत पुजारी, प्रशांत दिवेकर, विनया बहुलीकर, अजय भोकरे, किरण वैष्णव, राजू कदम, सुधीर कुरुंदकर, नितीन लगस, महेंद्र जोशी, प्रमोद प्रभुणे, नवनाथ निवंगुणे, बाळासाहेब शेलार, बाबुराव घाडगे, रामदास गाडे, संतोष नांगरे या पदाधिकाऱ्यांसह महायुतीचे माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, “मेट्रो, मल्टिमोडल हब, उड्डाणपूल, रस्ते निर्मिती, कलाग्राम, पर्वतीचे जतन व संवर्धन, ईएसआयसीसी रुग्णालय, पर्यावरण आराखडा, झोपडपट्टी पुनर्वसन, पानशेत पूरग्रस्ताचा मालकी हक्क, आंबीलओढा सीमाभिंती, सुरळीत पाणीपुरवठा, विद्युत, मार्केट यार्डातील प्रश्न अशी विकासकामे मार्गी लावली.
आमदार विकास निधी आणि शासनाच्या विशेष निधीतून १७६ कोटी ४३ लाख रुपयांची विविध विकासकामे केली. स्वारगेट एसटी स्थानकाचा पुनर्विकास, सिंहगड उड्डाणपूल व विठ्ठलवाडी घाट, गंगाधाम चौकातील वाहतूक प्रकल्प, पु. ल. देशपांडे स्मृती संग्रहालय, ईएसआयसी रुग्णालयाचे विस्तारीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन, आंबील ओढा सुरक्षा उपाययोजना, महिलांसाठी स्वच्छतागृहे, सायबर पोलीस स्टेशन आदी महत्त्वाचे प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी मतदारांना दिले.





