Jantar Mantar Protest : ‘लाठीचार्ज प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा’; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे मोदी, शहांना पत्र
जंतर-मंतर येथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थी आणि वकिलांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जप्रकरणी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Jantar Mantar Protest – जंतर-मंतर येथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थी आणि वकिलांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जप्रकरणी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या घटनेची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी विनाकारण आणि अवाजवी बळाचा वापर केला. यात विद्यार्थी, वकील, पत्रकार आणि प्रथमोपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांनाही लक्ष्य करण्यात आले. पुरुष पोलिसांनी महिला आंदोलक आणि १६ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवरही लाठीमार केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
ही कारवाई घटनेच्या कलम १९ आणि २१ तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितामधील नियमांचे थेट उल्लंघन करते. हा प्रकार आपल्या घटनात्मक लोकशाहीच्या मूळ रचनेवर झालेला आघात आहे. वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांवरही पोलिसांनी जाणीवपूर्वक हल्ले केले, जे अत्यंत गंभीर आहे असे त्यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली वेळेत चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्यात यावा तसेच निष्पक्ष चौकशीसाठी दिल्ली पोलीस आयुक्तांना तात्काळ निलंबित करावे आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवावा आणि वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य पसरले असून शिक्षण मंत्रालयाची प्रशासकीय जबाबदारी निश्चित केली जावी आदी मागण्यात बार असोसिएशनने केल्या आहेत.





