Pune District : महिन्याभरातच काँक्रीट रस्त्याला तडे
Pune District : सेवा रस्त्याच्या कामात नवीन व दर्जेदार बेस मटेरियल वापरण्याऐवजी जुनाच उकरलेला मातीमिश्रित मुरूम तसेच जुना जीएसबी पुन्हा वापरला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला आहे.

वरवंड : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील वरवंड (ता. दौंड) गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या सेवा रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काम पूर्ण होऊन अवघा महिनाही लोटला नसताना काँक्रीट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे पडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याची पातळी असमतोल असल्याने वाहनचालकांना मोठ्या हादऱ्यांचा सामना करावा लागत आहे.
सेवा रस्त्याच्या कामात नवीन व दर्जेदार बेस मटेरियल वापरण्याऐवजी जुनाच उकरलेला मातीमिश्रित मुरूम तसेच जुना जीएसबी पुन्हा वापरला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत तातडीने तांत्रिक तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एनएचएआयच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तसेच स्वतंत्र गुणवत्ता तपासणी पथकाने वरवंड येथे प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. रस्त्याचे तांत्रिक मापदंड, काँक्रीटची गुणवत्ता, बेस लेअर, वापरलेली सामग्री, जाडी, लेव्हल, मजबुती यांची निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी आहे. तपासणीत काम निकृष्ट आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, आवश्यक असल्यास कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
अंधारात काँक्रीटीकरण उरकले
काँक्रीटीकरण करताना योग्य लेव्हल, लाइन व तांत्रिक मापदंडांची तपासणी केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही कामे रात्रीच्या अंधारात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काँक्रीटच्या कामासाठी आवश्यक असलेली व्हायब्रेटर पेवर किंवा अन्य योग्य यंत्रसामग्री वापरली जात नसल्याचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.
दर्जेदार आभासी गुणवत्तेची पोलखोल?
रस्ता पूर्ण झाल्यानंतर अल्पावधीतच त्यावर तडे पडल्याने काँक्रीटची गुणवत्ता, बेसची मजबुती, बांधकामाची पद्धत आणि देखरेख यांची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील काम असल्याने संबंधित यंत्रणांनी केवळ कागदोपत्री तपासणी न करता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन कामाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भूमिकेवरही नाराजी
कामाबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित कंत्राटदार कंपनी एनपी इन्फ्राचे प्रोजेक्ट मॅनेजर विशाल राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, फोन न उचलणे तसेच संपर्क झाल्यास नागरिकांशी उर्मटपणे बोलल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचा दावा संबंधितांकडून केला आहे.





