Pune District : ऋषी पंचमीनिमित्त ‘उपवास उद्यापन’
Pune District : ग्रामस्थांच्या वतीने महिलांना अंघोळीची व्यवस्था केली होती. अभय देशपांडे, सचिन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी पादुका अभिषेक व विधिवत पूजा केली.

वाल्हे : आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींची संजीवनी समाधी मंदिर असलेल्या वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षि वाल्मिकी स्थळाला ऋषीपंचमी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिवसभरात हजारो महिलांनी दर्शन घेऊन उपवास उद्यापनास हजेरी लावून वाल्मिकी ऋषींच्या पादुकांना अभिषेक केला.
यावर्षी राज्यातून महिला ऋषिपंचमीच्या दिवशी उपवास उजवण्यासाठी मंदिर परिसरात आल्या होत्या. पुणे जिल्ह्यातील वाल्हे येथे ऋषींचे एकमेव स्थान आहे. या ठिकाणी वाल्मिकी ऋषींची संजीवनी समाधी असून जवळच सात रांजण नावाने रामायणातील प्रसिद्ध डोंगर आहे. राज्यातील विविध भागातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी येत असतात. वाल्मिकींच्या मूर्तीला व पादुकांना जलअभिषेक घालण्यासाठी महिला भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी हजारो महिलांनी समाधीस्थळी अभिषेक करुन आरती करुन समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
ग्रामस्थांच्या वतीने महिलांना अंघोळीची व्यवस्था केली होती. अभय देशपांडे, सचिन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी पादुका अभिषेक व विधिवत पूजा केली. यावेळी परिसरात पुजेच्या साहित्याची दुकाने सजली होती. महिलांनी उपवास सोडले. दरम्यान मंगळवारी पहाटे आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषी समाधी मंदिराचे पुजारी ह.भ.प. बबन महाराज भुजबळ यांच्या हस्ते अभिषेक घालून विधिवत पूजा केली.
यावेळी उद्योजक मोहन पवार, राजेंद्र काळंगे, मदन भुजबळ, रूपेश भोसले, मारूती रोकडे, विनोद रोकडे, परेश काळंगे, श्रेया काळंगे, अल्हाद पवार उपस्थित होते. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. हनुमान वस्ती व आडाचीवाडी भजनी मंडळाकडून भजन सेवा केली. आरतीचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस दूरक्षेत्रातील सहायक पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप, हवालदार भाऊसाहेब भोंगळे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.





