Pune District : पशुधनाला लाभणार विमा संरक्षण
Pune District : या योजनेअंतर्गत विमा हप्त्याची ८५ टक्के रक्कम केंद्र व राज्य शासन (६०:४० प्रमाणात) भरणार असून, लाभार्थी पशुपालकाला केवळ १५ टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे.

पुणे : राज्यभरातील पशुपालकांच्या पशुधनाला विविध आजार, अपघात, विषबाधा व नैसर्गिक आपत्तींपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना राबवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेसाठी पशुपालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून २५ ऑगस्ट २०२६ रोजी ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. (एआयसी) या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली.
या योजनेअंतर्गत विमा हप्त्याची ८५ टक्के रक्कम केंद्र व राज्य शासन (६०:४० प्रमाणात) भरणार असून, लाभार्थी पशुपालकाला केवळ १५ टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे. १ वर्षासाठी ४.३० टक्के, २ वर्षांसाठी ७.५० टक्के आणि ३ वर्षांसाठी १०.५० टक्के असा प्रिमियम दर निश्चित करण्यात आला आहे. पूर, वीज पडणे, अपघात आणि अनैसर्गिक मृत्यू झाल्यास पशुपालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
७०, ००० रुपये किंमत असलेल्या संकरित गायीसाठी १ वर्षाकरिता एकूण ३,०१० रुपये विमा हप्ता होतो, त्यापैकी पशुपालकाला ४५१.५० रुपये भरावे लागतील. २ वर्षांसाठी ७८७.५० रुपये आणि ३ वर्षांच्या कालावधीसाठी १, १०२.५० रुपये पशुपालकाचा १५ टक्के हिस्सा राहील.
जनावराचा मृत्यू झाल्यास २४ तासांच्या आत नोंदणीकृत माध्यमाद्वारे विमा कंपनीला कळवणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल सादर केल्यानंतर १५ दिवसांच्या आत विम्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. विम्याची रक्कम मुदतीत न दिल्यास कंपनीला १२ टक्के दराने व्याज द्यावे लागेल, अशी माहिती महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे यांनी दिली.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय हा राज्यातील लाखो पशुपालकांसाठी दिलासादायक आहे. सर्व पशुपालकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले पशुधन सुरक्षित करावे.
– पंकजा मुंडे, मंत्री, पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल.नैसर्गिक आपत्ती व अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास १५ दिवसांत थेट बँक खात्यात भरपाई मिळेल. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येईल व शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळेल.
-डॉ. रामास्वामी एन., सचिव, पदुम.
विमा संरक्षणाची मर्यादा व स्वरूप
एका कुटुंबातील कमाल १० जनावरांसाठी अनुदानाचा लाभ.
दुभती गाय व बैल – कमाल मूल्य ७०, ००० रुपयांपर्यंत संरक्षण.
दुभती म्हैस व रेडे -कमाल मूल्य ८०, ००० रुपयांपर्यंत संरक्षण.
शेळी व मेंढी – कमाल मूल्य ७,००० रुपये प्रति जनावर.
तंत्रज्ञान वापर – भारत पशुधन प्रणालीवर १२ अंकी कानातील बिल्ल्यासह नोंदणी बंधनकारक; नो टॅग, नो क्लेम नियमाचे कडक पालन.





