महायुतीचा अजब निर्णय! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनच वसूली, उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले…

मुंबई : पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीटन ५ रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० रुपये असे एकूण टनामागे १५ रु. कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या १५ रुपयांवरुन उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
सरकारने एकीकडे शेतकऱ्याचाच खिसा कापत दुसरीकडे शेतकऱ्यांना मदत करण्याचा कार्यक्रम सुरू केल्यावरून ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या साखरसम्राट भाजपमध्ये गेले आहेत, त्यांचे कर्ज सरकार भरणार आहे. आता शेतकरी भाजपात आल्यानंतरच त्यांची कर्जमुक्ती करणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. तुम्ही साखर सम्राटांसाठी माफी दिली, आम्ही गोरगरीब शेतऱ्यांसाठी मागणी करतोय.
ज्या शेतकऱ्यांवर आपली जमीन, मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ आलेली आहे. सध्या पीक नष्ट झाल्याने शेतकरी कर्जाच्या बोज्यात दाबून गेले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट आहे, मी देखील अतिवृष्टीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सरकारला हात जोडून राजकारण न आणण्याची आणि एकत्र येऊन मार्ग काढण्याची विनंती केली आहे.
मात्र, मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात व्यस्त तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नसतात आणि शेतकरी वाऱ्यावर पडला आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या आहेत, रस्ते वाहून गेले आहेत, सरकारने तातडीने लक्ष द्यावे. सरकार काम करत नाही, केवळ कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे जावे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.





