Tamil Nadu : ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’ कंपनीला ठोकले टाळे; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Tamil Nadu – कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूंनंतर, तामिळनाडू सरकारने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात या कफ सिरपमुळे बावीस मुलांचा मृत्यू झाला आहे.
तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटने कंपनीविरुद्ध ही कठोर कारवाई केली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, चौकशी पूर्ण झाल्यानंतर कंपनी औपचारिकपणे बंद करण्यात आली आहे. कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोलचे (डीईजी) प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.
तामिळनाडू सरकारने राज्यातील सर्व औषध कंपन्यांची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान, न्यायालयाने श्रीसन कंपनीचे मालक रंगनाथन यांना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रंगनाथन यांना मध्य प्रदेश विशेष तपास पथकाने ९ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.
तामिळनाडू सरकारने दोन वरिष्ठ औषध निरीक्षकांनाही निलंबित केले आहे. मध्य प्रदेशात २२ मुलांच्या मृत्यूनंतर, कोल्ड्रिफ कफ सिरपवर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली. तथापि, कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा प्लांट तामिळनाडूमध्ये आहे.
भाजप नेते के. अन्नामलाई यांनी या घटनेबद्दल तामिळनाडू सरकारवर टीका केली. प्रकरण वाढल्यानंतर सरकारने औषध निरीक्षकाला निलंबित केले. आता, सरकारने कंपनी बंद केली आहे आणि तिचा परवाना रद्द केला आहे.





