IMD weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) नोव्हेंबर २०२५ च्या हवामान अंदाजात दिलासा देणारी माहिती दिली आहे. देशाच्या बहुतांश भागांत दिवसाचा तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा खालील राहण्याची शक्यता असली तरी रात्रीचा तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. यामुळे थंडीचे प्रमाण कमी राहील आणि महिना सुखकारक वाटेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर-पश्चिम भारतातील काही भागांत सामान्य किंवा त्यापेक्षा कमी रात्रीचे तापमान राहू शकते, तर इतरत्र उष्णता वाढेल. IMD च्या अंदाजानुसार, ला नीना परिस्थिती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत कायम राहण्याची शक्यता असली तरी ती कमकुवत आहे. ही परिस्थिती सामान्यत: थंडी वाढवते, पण यावेळी नोव्हेंबरमध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहूनही रात्रीची थंडी मर्यादित राहील. देशभरात पावसाची सरासरी सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून, उत्तर-पश्चिम भारत आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांत कमी पाऊस पडेल. महाराष्ट्राच्या बाबतीत, ऑक्टोबर महिन्यात मॉन्सून परतीच्या काळात जोरदार पावसाने हाहाकार माजवला. १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान राज्यात ७७.७ मिमी पावसाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा ५ टक्क्यांनी जास्त आहे. कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला, तर इतर भागांत सरासरी पावसाची नोंद आहे. यावर्षीचा ‘ऑक्टोबर हीट’ मात्र नागरिकांसाठी त्रासदायक ठरला, ज्यामुळे उष्णतेची लाट अनुभवली गेली. विदर्भात हलका पाऊस नोव्हेंबरसाठी महाराष्ट्रात पावसाची शक्यता मर्यादित आहे. ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता असली तरी, नंतरच्या आठवड्यात कोकणातील काही भागांत सरी कोसळू शकतात. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान राहू शकते, पण थंडीचे प्रमाण कमी असल्याने हा महिना सुखावह राहण्याची अपेक्षा आहे. IMD च्या दीर्घकालीन अंदाजानुसार, राज्यात सामान्य हवामान राहील, ज्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळेल.