देशाचे नेतृत्व करणारे सहकार संपुष्टात आणणार नाहीत- खासदार शरद पवार

हडपसर(प्रतिनिधी) – देशातील सहकारात गुजरात आणि महाराष्ट्रचे योगदान मोठे आहे. देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा हेही गुजरातचे आहेत. त्यामुळे सहकारात सहभागी असणारे हे दोघेही सहकार उध्वस्त करू शकत नाहीत, मात्र आरबीआयचा वाढता हस्तक्षेप पहाता तसेच रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणाविरोधात न्यायालयात जावू, असा इशारा खासदार शरद पवार यांनी दिला.
येथील साधना सहकारी बँक मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ,माजी खासदार विठ्ठल तुपे पाटील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच बँकेच्या साडेसतरानळी शाखेचे स्थलांतर खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.त्यावेळी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
शरद पवार पुढे म्हणाले की, सहकारात गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्य एका बाजूला तर इतर सर्व राज्य एका बाजूला असे योगदान आहे.याशिवाय या राज्यातील लोक व काही मंत्रीही सहकारात सहभागी आहेत.त्यामुळे सहकार कधीही उध्वस्त होवू शकत नाही,परंतु नागरी व सहकारी बँकेचे संचालक नेमण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक हळूहळू आपल्याकडे घेत असल्याचे दिसून येत आहे .
यावेळी पद्मश्री डॉ.सुदाम काटे, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, अमनोरा सिटीचे प्रमुख अनिरुद्ध देशपांडे, आमदार चेतन तुपे पाटील, साधना सुकाणू बँकेचे दिलीप तुपे, बँकेचे चेअरमन अनिल तुपे, व्हाईस चेअरमन आबासाहेब कापरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चारुचंद्र सोहोनी, सहायक महाव्यवस्थापक संजय शेवकर, बँकेचे संचालक सुरेश घुले, चंद्रकांत कवडे, बबन मगर, रमेश घुले, प्रविण तुपे, दिनकर हरपळे, सुभाष का.काळभोर, सिद्राम राऊत, सुभाष न. काळभोर, वंदना काळभोर, बाळासाहेब गुजर, बाळासाहेब कोळपे, राजेश कवडे, रोहिणी तुपे, शंकर बडदे, तज्ञ संचालक योगेश भगत, कार्यालक्षी संचालक भाऊ तुपे, शंकर घुले,अडमीन इंचार्ज अविनाश पाटील आदींसह बँकेचे सभासद उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमास लीलावती विठ्ठल तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घुले, प्रकाश म्हस्के हेही उपस्थित होते.
आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले, काही बँका नक्कीच चुकत असतील त्यांना नक्कीच कायदा करा ,परंतु चांगले काम करणाऱ्या बँकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मात्र आरबीआयकडून तसे होताना दिसत नाही. त्यासाठी सहकाराचे कायदे बदलणे गरजेचे आहे आणि ते काम केवळ सहकाराची जाण आणि आधारवड असणारे शरद पवार साहेब हेच करू शकतील . साधना सहकारी बँकेचे खरे जनक माजी खासदार स्वर्गीय विठ्ठल तुपे हे असून त्यांनी नेहमीच बँकेचा वटवृक्ष व्हावा यासाठी प्रयत्न केले. मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत रहा असे विठ्ठल पाटील सांगत असे प्रास्ताविकात चेअरमन अनिल तुपे यांनी सांगितले.बँकेने आठशे कोटींचा टप्पा पार केला असून सातत्याने ऑडिट वर्ग अ बँकेने टिकवून ठेवला आहे. साधना बँक ही लवकरच शेड्युल बँक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही चेअरमन तुपे यांनी सांगितले.

हडपसर : साधना सहकारी बँकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करताना खासदार शरद पवार, आमदार चेतन तुपे, सुकाणू समिती सदस्य दिलीप तुपे, चेअरमन अनिल तुपे, व्हाईस चेअरमन आबा कापरे.
दरम्यान हडपसर मधील बंद असलेल्या जुना कालव्यावरून भैरोबानाला ते उरुळी कांचन पर्यंत सुमारे दीडशे फूट रुंदीचा पर्यायी रस्ता व्हावा अशी अपेक्षा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे यांनी व्यक्त करत शरद पवार साहेब यांनी यासाठी संबधित विभागाला सूचना कराव्यात, अशी मागणी यावेळी केली.

हडपसर : साडेसतरानळी येथे साधना बँकेच्या आवारात उभारलेल्या माजी खासदार स्वर्गीय विठ्ठल तुपे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना खासदार शरद पवार, आमदार चेतन तुपे, दिलीप तुपे, अनिल तुपे, आबा कापरे, लीलावती तुपे.
विद्याधर अनास्कर म्हणाले, अर्थ व्यवस्थेत आपली उपयोगिता बँकांना सिद्ध करता आली पाहिजे. राजकीय व्यक्ती आणि राजकारण हे सहकाराचे कुंपण आहे .आणि कुंपनच शेत जेव्हा खायला लागते तेव्हा बँका अडचणीत येतात. त्यामुळे सहकारात राजकारण कधीही नसावे, मात्र राजकारणात सहकार असायला हरकत नाही. सहकारातील बँकांना व्यवहार जमत नाही असा आरबीआयच्या लोकांचा गैरसमज आहे तो दुर व्हायला हवा, अन्यथा न्यायालयीन लढाई लढूनच नागरी ,सहकारी बँकाची विश्वासहर्ता वाढवावी लागेल.
प्रास्ताविक चेअरमन अनिल तुपे यांनी केले, प्रा.नितीन लगड यांनी सूत्रसंचालन केले ,तर उपाध्यक्ष आबासाहेब कापरे यांनी आभार मानले.





