Foreign investing in India : परदेशी गुंतवणूक भारतात परतण्याची शक्यता, CLSAने दिला महत्वपूर्ण सल्ला…

Foreign investing in India : – परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी दीड महिन्यात भारतातून 1.2 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. यातील बराच भाग चीनमध्ये गुंतवला आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात बरेच करेक्शन झाले आहे. आता जागतिक पातळीवरील ब्रोकरेज संस्था असलेल्या सीएलएसए (Credit Lyonnais Securities Asia) ने बदललेल्या परिस्थितीनुसार चीनमधील गुंतवणूक कमी करून भारतात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर ही संस्था भारतात गुंतवणूक वाढविणार आहे. त्यामुळे आगामी आठवड्यात भारतीय निर्देशांकांना काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता खुली झाली आहे.
भारतात झालेल्या करेक्शननंतर जगातील बर्याच गुंतवणूकदार संस्था भारतात गुंतवणूक करण्याची वेळ ठरवत आहेत. सीएलएसएने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आम्ही भारताला 20% वेटेज देतो. दरम्यानच्या काळात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले आहेत. चीनला ट्रम्प यांचा कडवा विरोध आहे. चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर आधारित आहे. चीनची अमेरिकेला होणारी निर्यात कमी होणार असल्यामुळे चिनी कंपन्यात जागतिक गुंतवणूकदार आगामी काळात गुंतवणूक कमी करतील.
अशा परिस्थितीत यातील काही गुंतवणूक भारतात पुन्हा वळण्याची शक्यता आहे. अगोदर या संस्थेने भारतातील शेअरच्या किमती आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत आणि चीन सरकार सवलती देत आहे या कारणामुळे चीनमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्रात प्रश्न वाढले आहेत. बेकारी वाढली आहे. चीनने अनेक देशाशी शत्रुत्व घेतल्यामुळे चीनच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.
त्यातच डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे चीन संबंधातील आपले मत या संस्थेने बदलले आहे. 2023 मध्ये सीएलएसएने भारतात गुंतवणूक करण्याचा सल्ला जागतिक गुंतवणूकदारांना दिल्यानंतर तेव्हापासून भारतीय शेअर बाजारात बरीच परकीय गुंतवणूक झाली आहे. भारताला रशियाचे स्वस्त खनिज तेल मिळत आहे. भारतीय विकास दर जगात सर्वात जास्त असल्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याचा सल्ला त्यावेळी या संस्थेने दिला होता. आता पुन्हा या संस्थेने भारतात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Gold Price Correction : 4 नोव्हेंबर पासून सोन्याच्या दरात सहा टक्क्यांनी घसरण…
भारत सुरक्षित गुंतवणुकीचा स्वर्ग
भारतात परकीय गंगाजळीची परिस्थिती बळकट आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतल्यानंतर भारतातील संस्थागत गुंतवणूकदारांनी विशेषता म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक करून निर्देशांकांना आधार आधार दिला. किरकोळ गुंतवणूकदार या परिस्थितीतही गुंतवणूक करून किल्ला लढवित आहेत. जगातील तणावाचा भारतावर फारसा परिणाम झालेला नाही. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत सुरक्षित गुंतवणुकीचा स्वर्ग ठरणार असल्याचे मत या संस्थेने व्यक्त केले.





