सरलेल्या आठवड्यात निर्देशांकात वाढ; परदेशी गुंतवणूक वाढली

मुंबई : सरलेल्या आठवड्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात पुन्हा गुंतवणूक वाढविली आहे. त्याचबरोबर किरकोळ गुंतवणूकदार आता खरेदीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या आठवड्यात निर्देशांकात भरीव वाढ झाली. आतापर्यंत गुंतवणूकदार कमालीचे सावध होते. मात्र आता खुल्या दिल्याने खरेदीसाठी गुंतवणूकदार शेअर बाजारात उतरले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
इराण आणि इस्त्रायल दरम्यानचा संघर्ष समाप्त झाला आहे. त्याचबरोबर भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार करार होण्याची शक्यता वाढली आहे. रुपया बळकट होत आहे. खनिज तेलाच्या किमती कमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक नफादायक ठरणार आहे. शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आठवड्याच्या पातळीवर वाढून 25,637 अंकावर बंद झाला. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स वाढून 84,058 अंकावर बंद झाला.
रॅलीगेअर ब्रोकिंग कंपनीचे संशोधन प्रमुख अजित मिश्रा यांनी सांगितले की, देशातील आणि परदेशातील वातावरण आता सकारात्मक झाले आहे. मुळातच भारताची अर्थव्यवस्था बळकट असताना परदेशातील घडामोडीमुळे निर्देशांकावर दबाव होता. आता तो दबाव पूर्णपणे संपुष्टात आला आहे. शुक्रवारी परदेशी गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात तब्बल 12 हजार कटी रुपयांची गुंतवणूक केली. यावरून त्यांचा भारताबद्दलचा आशीर्वाद दिसून येतो.
या आठवड्यात बहुतांश क्षेत्राचे निर्देशांक वाढले. धातू,वित्तीय सेवा, ऊर्जा, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राचे निर्देशांक वाढले. मात्र रिअॅल्टी क्षेत्रात नफेखोरी झाली. विशेष म्हणजे मुख्य निर्देशांकांबरोबरच छोट्या कंपन्यावर आधारित स्मॉल कॅप 2.4 टक्क्यांनी तर मिडकॅप 4.3 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे बाजारातील तेजी विस्तारित होती असे दिसून येते.
कंपन्यांच्या ताळेबंदाकडे लक्ष
लवकरात पहिल्या तिमाहिचे ताळेबंद जाहीर केले जाणार आहेत. त्याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर 9 जुलैपूर्वी भारत अमेरिकेदरम्यान व्यापार करार होणार आहे. या करारातील तरतुदीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहील. या दोन बाबी पुढील पंधरवड्यात निर्देशांकांना दिशा देतील असे विश्लेषकांनी सांगितले. पाऊस व्यवस्थित पडत असल्यामुळे कृषी क्षेत्राकडून अर्थव्यवस्थेला आधार मिळण्याची शक्यता आहे.





