Tuhin Kanta Pandey : परकीय गुंतवणूकदारांचा भारतावर विश्वास; सेबीचे अध्यक्ष तुहीनकांत पांडे यांचा दावा

मुंबई : परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावर विश्वास कायम आहे. सध्या जागतिक परिस्थिती खराब असल्यामुळे या गुंतवणूकदारांनी अल्प प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली असली तरी इतर देशांच्या तुलनेत भारतीय बाजारात या गुंतवणूकदारांची गुंतवणूक तुलनेने जास्त आहे असे मत शेअर बाजार नियंत्रक तूहीनकांत पांडे यांनी व्यक्त केले.
एका माध्यम समूहाने बँकींग आणि वित्तीय क्षेत्रावर आयोजित केलेल्या परिसंवादात ते म्हणाले की, काही महिन्यांमध्ये या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून चार अब्ज डॉलरची विक्री केली आहे हे खरे आहे. मात्र या गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात केलेल्या एकूण 900 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीच्या तुलनेत गुंतवणूक काढण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे या विषयावर चिंता करण्याची आपल्याला गरज वाटत नाही असे ते म्हणाले.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार जगातील विविध देशातील परिस्थितीप्रमाणे आपल्या गुंतवणुकीचे निर्णय घेत असतात. तुलनात्मक अभ्यास केला तर या गुंतवणूकदारांचा भारतावर निश्चितच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. या गुंतवणूकदाराबरोबर आमची निरंतर चर्चा चालू असते. गुंतवणुकीत त्यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो असे ते म्हणाले.
एएसईचा आयपीओ लवकरच
राष्ट्रीय शेअर बाजाराची प्राथमिक समभाग विक्री म्हणजे आयपीओ बर्याच दिवसापासून लांबणीवर पडलेला आहे. लवकरच हा आयपीओ उपलब्ध होईल असे पांडे यांनी सांगितले. यासंदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी या अगोदरच्या अध्यक्षानी एक समिती नेमली होती. ही समिती आपला अहवाल दहा नोव्हेंबर रोजी सादर करणार आहे. या अहवालातील शिफारशीच्या आधारावर अडचणी दूर होतील आणि पुढील प्रक्रिया वेग घेईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
आयपीओ लवकरच निघेल असे पांडे यांनी सांगितले असले तरी त्यांनी निश्चित वेळापत्रक सांगण्यास असमर्थता दर्शविली. या विषयावर बरीच चर्चा होण्याची गरज आहे. ही चर्चा कधी संपेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रक्रिया कधी सुरू होईल हे सांगता येणे अवघड असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पांडे यांनी एसआयपीमधील गुंतवणुकीची रक्कम कमी करण्यासंदर्भात चर्चा चालू असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या एसआयपी आल्यानंतर त्या लोकप्रिय कशा होतील यासंदर्भातही चर्चा चालू असल्याचे त्यांनी सांगितले.





