Gold Price Correction : 4 नोव्हेंबर पासून सोन्याच्या दरात सहा टक्क्यांनी घसरण…

मुंबई – चार नोव्हेंबरपूर्वी सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर चलन, शेअर आणि धातू बाजारातील समीकरणे बदलली आहेत. या कालावधीत भारतीय वायदे बाजारात सोन्याचा दर 4,750 रुपयांनी म्हणजे सहा टक्क्यांनी कमी झाला आहे.
ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर डॉलर इतर चलनाच्या तुलनेत कमालीचा बळकट झाला आहे. डॉलर जितका बळकट होईल तितके सोने कमकुवत होते असे समजले जाते. एकीकडे सोन्याच्या दरात 6% करेक्शन झाले असतानाच जगातील प्रमुख सहा चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स वाढून 106 अंकापर्यंत गेला आहे.
डोनाल्ड ट्रम्प आक्रमकरित्या अमेरिका फर्स्ट धोरण अवलंबविणार आहेत. त्यामुळे डॉलर बळकट होत आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. अशा परिस्थितीत बरीच जागतिक गुंतवणूक या दोन वित्तीय साधनाकडे गेली आहे. यामुळे जगातील गुंतवणूकदारांनी सोन्याकडे दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत सोन्याचे दर कमी होत आहेत.
त्या अगोदर अमेरिकेने व्याजदरात अर्धा टक्के कपात केली होती. त्यामुळे डॉलर कमकुवत झाला होता. मात्र आता अमेरिका परकीय वस्तूवर आयात शुल्क वाढविणार आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेत वस्तू महाग होतील आणि अमेरिकेत महागाई वाढेल. त्यामुळे अमेरिकेतील व्याजदर कपात लांबणीवर पडणार आहे. याचा सोन्याच्या मूल्यावर परिणाम होत आहे.





