जीएसटी सुधारणा व परकीय गुंतवणुकीमुळे रुपया ४० पैशांनी मजबूत; डॉलर ८६.९९ वर

मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. त्याचबरोबर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी काही प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत भारतीय रुपयाचे मूल्य मंगळवारी 40 पैशानी वाढून 86 रुपये 99 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेले.
भारत सरकारने जीएसटीचे टप्पे कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारही केंद्र सरकारच्या पुढाकाराला प्रतिसाद देतील अशी वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळेही रुपयाच्या मूल्यात सुधारणा होण्यास मदत झाली.
खनिज तेलाचे दर सध्या जागतिक सकारात्मक परिस्थितीमुळे कमी होऊन 65 डॉलर प्रति पिंप या पातळीवर आले आहेत. रशिया युक्रेन युद्ध समाप्त होण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती झाली आहे. अशा परिस्थितीत भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी केले तरी अमेरिका अतिरिक्त 25% आयात शुल्क लावण्याची शक्यता कमी झाली आहे.
या सर्व बाबीमुळे भारतातील आयातदारांनी डॉलरची मागणी कमी केली आहे. दरम्यानच्या काळामध्ये डॉलर इतर चलनाच्या तुलनेत कमकुवत होत आहे.या परिस्थितीचा भारतीय रुपयाला आधार मिळत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. क्रुडच्या किमती आणखी कमी झाल्या तर भारतीय रुपयाचे मूल्य आणखी वधारू शकेल असे सांगितले जाते.





