जयंत पाटलांसोबत बंद दाराआड भेट; नेमकी काय झाली चर्चा? अजित पवारांनी केला खुलासा

Ajit Pawar And Jayant Patil | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. यावर आता स्वत: अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधत स्पष्टीकरण दिले आहे.
“एआय अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता संबंधीच्या एका कमिटीत जयंत पाटील यांच्यासह इतरांचाही समावेश आहे. त्यांनी याबाबतच्या बैठकाही घेतल्या. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मी कृषी क्षेत्रातील एआयच्या वापराबाबत भाष्य करत ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. एआयचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे,” असे अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले की, “एआयच्या संदर्भात जयंत पाटील यांचे काय मत आहे, काय सूचना आहेत, ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. पण आमच्या भेटीनंतर बाहेर वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरल्या. मला त्यासंदर्भातील फोन आल्यानंतर मी सांगितले की त्यात कोणतेही तथ्य नाही,” असा खुलासा अजित पवार यांनी केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज गर्दी होती. परंतु जयंत पाटील त्यांना भेटण्यासाठी आल्यावर अजित पवार यांच्या कक्षात असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. सुरक्षा रक्षकांनाही बाहेर काढण्यात आले. अजित पवार यांच्या स्वीय सहायकांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बंद दाराआड चर्चा सुरु झाली होती, त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.
तसेच मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहे, त्यातच या दोघांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
हेही वाचा:
Devendra Fadnavis : दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा





