नागपूर : नागपूरात औरंगजेब याच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर सायंकाळी दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली. दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड तसेच दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवरताना पोलिस आणि नागरिक जखमी झाले होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच नागपूर दौरा केला.
तसेच हिंसाचाराबाबत वरिष्ठ पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषदेत घेत मोठे विधान केले आहे. या दंग्यामध्ये गाड्यांचे नुकसान झालं आहे, 33 पोलीस जखमी झाले आहेत. हिंसाचारात सहभागी असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. विशेषतः, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलिसांनी चार-पाच तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या सगळ्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण याआधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत 104 दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक केली आहे. तर 12 जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे, असे फडणवीस म्हणाले.
पुढे म्हणाले, जो व्यक्ती दंगल करताना दिसतोय किंवा दंगलखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याच्या मानसिकतेत पोलीस आहेत. मोठ्याप्रमाणावर सोशल मिडिया ट्रॅकिंग करुन ज्या लोकांना दंगल भडकावण्यासाठी चिथावणी दिली, त्यांनाही सहआरोपी केले जाणार आहे. आतापर्यंत एकूण 68 पोस्ट डिलिट करुन कारवाई करण्यात आली आहे. ज्या लोकांनी भडकावणारं पॉडकास्ट केले, अफवा पसरवल्या, अशा सर्व लोकांवर कारवाई होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नागपूर हिंसाचारात एका तरुणाचा बळी
हिंसाचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इरफान अन्सारी असं मृत व्यक्तीच नाव आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. राडा झालेल्या भागात ते जखमी अवस्थेत आढळून आला होता. नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपींची संख्या 105 झाली आहे. आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.