Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाच्या मुद्यावर तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला असून, दसऱ्यानंतर महाएल्गार काढणार असल्याची माहिती मिळत आहे. या सगळ्या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेत पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार सहभागी होता, असा खळबळजनक आरोप भुजबळांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. समता परिषदेत भुजबळांनी वरील विधान केलं आहे. आज नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडत असून या मेळाव्याला पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली आहे. मंत्री छगन भुजबळ हे देखील नागपूरात पोहचले असून, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ओबीसींच्या मोर्चाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. सुरूवातीला महाराष्ट्रातील अनेक भागात मोर्चा काढणार असून त्यानंतर गरज पडली तर मुंबई आणि मग दिल्लीला जाणार असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत. तसेच भुजबळांनी मनोज जरांगे यांना जे समर्थन करतात त्यांच्या जवळ जातात त्यांना ओबीसींनी एकत्र येऊन धडा शिकवला पाहिजे, असं विधान केलं होतं. जरांगेंवर पुन्हा साधला निशाणा या विधानावर त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केली आहे. या विधानाचा अर्थ कसा काढायचा असा प्रश्न त्यांना एका पत्रकाराने करताच भुजबळांनी ते आमचे लोक, ओबीसीचे कार्यकर्ते योग्य अर्थ काढतील, तुम्ही काळजी करू नका, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर निशाणा साधला. त्यांची (मनोज जरांगे) बरीच उपोषण झाली आहेत. २३ वेळा त्यांनी उपोषण केलं पण कोणीही त्याच्याकडे बघतही नव्हतं. पण पवार साहेब गेले, ते गेले म्हणून उद्धव ठाकरे तिकडे गेले आणि मग सगळेच तिथे जायला लागले, असं भुजबळ म्हणाले. हेही वाचा : “दोन जागा कमी-जास्त काही फरक पडत नाही, पण…” ; चिराग पासवान यांनी ठेवली मोठी अट