Devendra Fadnavis | फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर ; “राजकीय टीका चालू द्या, पण आम्ही समाजाच्या हितासाठी काम करतो”

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य सरकारचा निर्णय हा ओबीसी समाजाच्या हक्क्कांवर गदा आणणारा नाही. एकाही अपात्र व्यक्तीचा ओबीसीत समावेश होणार नाही, अशा प्रकारची काळजी निर्णयात घेण्यात आली आहे. यावर काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांसारख्या व्यक्तींना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. ओबीसींसाठीचे चांगले निर्णय सरकारनेच केले आहे. आरक्षणाच्या मुद्दयावर दोन्ही बाजूंनी केवळ राजकारण सुरू आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
सीओईपीतील कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, आरक्षणावरुन विरोधी पक्षातील लोकांना केवळ राजकारण करायचे आहे. मात्र, आम्हाला ओबीसी आणि मराठा समाजासोबतच सर्वच समाजांच्या हितांची काळजी आहे. मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता समोर आणणार नाही, तोपर्यत तेढ कमी होणार नाही. कुणबी नोंदी असणाऱ्यांच प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील जनतेने काळजी करण्याची गरज नाही.
ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याचे वातावरण तयार करण्याचे काम काही मंडळींकडून होत आहे. अशाप्रकारच्या वातावरणाचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि दुसरीकडे टोकाचेच राजकारण चालले आहे. अशा राजकारणाने समाजाचे कधीच चांगले होऊ शकत नाही. समाजातील लोकांपर्यत वावस्ताविकता पोहोचवली, तर सामाजिक तेढ कमी होईल. आमचे सरकार ही वास्ताविकता लोकांपर्यत पोहोचविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे नेत्यांनी कितीही राजकारण केले किंवा राजकीय मुद्दा बनवला, तरी हा समाज वास्तविकता समजून निर्णय घेतो, असेही ते म्हमाले.
आपापासांतील वैर..
आंदेकर टोळीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शहरात टोळीयुद्ध वगैरे काही नसून, आपापासांतील वैर आहे. हे वैरही आम्ही चालू देणार नाही. कोणीही डोक वर काढले तर, त्याचे डोके कसे खाली करायचे हे सरकारला ठाऊक आहे





