मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना थेट इशारा दिला आहे. “हैद्राबाद गॅझेटच्या जीआरविरोधात कोर्टात गेल्यास आम्ही 1994 च्या जीआरविरोधात कोर्टात जाऊ. भुजबळांनी मराठ्यांचे नुकसान केले, तर ओबीसींचे 16 टक्के आरक्षण धोक्यात येईल. हे 16 टक्के आरक्षण मराठ्यांच्या वाट्याचे आहे,” असा दावा जरांगे यांनी केला. “भुजबळांनी आमच्या जीआरला आव्हान दिल्यास, आम्ही 1994 च्या जीआरला आव्हान देऊ,” असेही ते म्हणाले. जरांगे यांनी मराठा समाजातील काही टीकाकारांवरही जोरदार टीका केली. “काही लोक आमच्यावर टीका करतात, पण त्यांनी समाजासाठी काहीच केले नाही. आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण, मोर्चे काढले की चर्चेसाठी हेच लोक पुढे येतात. त्यांचे कपडे, गाड्या, चष्मे आणि सेंटचा वासच मराठ्यांनी पाहिला आहे. आमच्या आंदोलनाच्या यशामुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे,” असे ते म्हणाले. यामध्ये एक माजी मंत्र्याचा मावस भाऊ (संजय लाखे पाटील, राजेश टोपेंचा भाऊ) आणि सांगलीतील माजी गृहमंत्र्यांचा पाहुणा यांचा उल्लेख करत, “यांनी फक्त कोर्ट कागद, चर्चा आणि मंत्र्यांच्या भेटी घेतल्या,” अशी टीका त्यांनी केली. आता कायदा सुव्यवस्था पाहणार नाही जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबतही इशारा दिला. “सरकारने जीआरमध्ये कोणताही बदल करू नये. जर गडबड झाली, तर महाराष्ट्र बंद करू. आता आम्ही कायदा सुव्यवस्था पाहणार नाही,” असे ते म्हणाले. ‘निर्णयात बदल झाल्यास रस्ते बंद’ ओबीसी उपसमितीच्या बैठकीबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडली. “कोणतीही बैठक घ्या, पण आमच्या निर्णयात बदल करू नका. बदल केल्यास राज्यातील सर्व रस्ते बंद करू,” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.