Chhagan Bhujbal : 10 टक्के आरक्षण नकोच का? भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल; नेत्यांनाही धरलं धारेवर म्हणाले…

Chhagan Bhujbal : राज्यात सध्या आरक्षणावरून चांगलेच वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजही मुंबईत महामोर्चा काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. तशा हालचाली सुर झाल्या असून दसऱ्यानंतर ओबीसी समाजाचा महामोर्चा मुंबईत धडकणार असल्याची माहिती मिळत आहे.
मराठा समाजासाठीच्या आरक्षणावर सरकारने हैदराबाद गॅझिटिअरचा जीआर काढल्यानंतर यावर ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. तेव्हापासून त्यांनी जीआर विरोध कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला होता. तसेच जीआरवरून ते सातत्याने अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत.
नुकतीच त्यांनी मराठा समाजासाठीच्या आरक्षणावर थेट सवाल विचारला आहे. तुम्हाला 10 टक्के EWS, राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाचे आरक्षणन नको का? तुम्हाला यापैकी कोणतेही मराठा आरक्षण नको का? मग हे आरक्षण रद्द करायचं का? असे थेट प्रश्न भुजबळांनी मराठा समाजाला केले आहेत.
तसेच त्यांनी मराठा समाज्यातील नेत्यांनी याबाबत बोलावं असं म्हणत राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी लागू असलेले कोणतेही आरक्षण नको, फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवे का, हे राज्यातील मराठा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी स्पष्ट करावे, असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं आहे.
काय म्हणाले भुजबळ?
मराठा समाज यापूर्वी खुल्या प्रवर्गातील 50 टक्क्यांमध्ये येत होता. मग पंतप्रधान मोदींनी 10 टक्के आरक्षण दिले. आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिक मागास आहेत पण सामाजिक मागास नाहीत, अशांसाठी हे 10 टक्के आरक्षण होते. त्यामध्ये एकटा मराठा समाज 80 टक्के होता. यानंतर राज्यात मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. तरीसुद्धा आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन होत आहे, असं भुजबळांनी म्हटलं आहे.
हे सगळे आरक्षण सोडून तुम्हाला…
पुढे ते म्हणाले, त्यामुळे मला मराठा समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला 10 टक्के EWS, राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाचे आरक्षण नको का? तुम्हाला यापैकी कोणतेही मराठा आरक्षण नको का? मग हे आरक्षण रद्द करायचं का? हे सगळे आरक्षण सोडून तुम्हाला फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे का, असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
मराठा नेत्यांनी याबाबत व्होकल झालं पाहिजे.
राज्यातील मराठा समाजातील नेत्यांनाही भुजबळांनी सवाल केले आहेत. अनेक माजी मराठा मुख्यमंत्री, मराठा समाजाचे केंद्रातील नेते, खासदार आणि आमदार जे शिकलेले आहेत आणि ज्यांना आरक्षणाच्या मुद्द्याची समज आहे, त्यांच्याकडून मला उत्तर हवे आहे. जे अशिक्षित आहेत, त्यांच्याकडून मला उत्तराची अपेक्षा नाही. मराठा नेत्यांनी याबाबत व्होकल झालं पाहिजे, असंही भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले आहेत.





