तमिळनाडूतील अद्रमुकमध्ये गृहकलह; पनीरसेल्वम यांची हकालपट्टी

चेन्नई – अद्रमुक पक्षाच्या कणखर नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर कसे बसे सरकार चालवणाऱ्या अद्रमुक पक्षात आता अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. या पक्षात गेल्या काही काळापासून दुहेरी नेतृत्वाची रचना कार्यान्वित होती. त्यात आता बदल करत माजी मुख्यमंत्री इ पलानीस्वामी अर्थात इपीएस यांची पक्षाच्या महासचिव या सर्वोच्च पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्यासोबत सहसमन्वयकाचे काम पाहणारे ओ पनीरसेल्वम ओपीएस यांची पक्षविरोधी कारवायांबद्दल हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षाच्या जनरल काउन्सिलमध्ये हा निर्णय घेण्यात आला. नेतृत्वात अडचणी येत असल्याचे कारण सांगत समन्वयक आणि सह समन्वयक ही पदे रद्द करण्यात आली आहेत. अगोदर अनुक्रमे पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्याकडे ही पदे होती. काउन्सिलमधील अडीच हजारपेक्षा अधिक प्रतिनिधींनी आता पलानीस्वामी यांच्याकडे सर्वाधिकार दिले आहेत. पनीरसेल्वम यांच्यावर द्रमुक सरकारची बाजू घेणे आणि पक्ष दुबळा करण्यासाठी कारवाया करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, आपल्या हकालपट्टीबाबत प्रतिक्रिया देताना पनीरसेल्वम म्हणाले की पक्षाच्या दीड कोटी कार्यकर्त्यांनी त्यांना सह समन्वयक म्हणून निवडले आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याचा अधिकार पलानीस्वामी अथवा अन्य कोणत्याही नेत्याला नाही. या विरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, चार महिन्यांत अद्रमुकच्या संघटनात्मक निवडणुका घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच महासचिव पदाची निवडणूक लढण्याच्या तरतूदींतही बदल करण्यात आला आहे.
तेलंगणा राष्ट्र समितीतही अनेक एकनाथ शिंदे; भाजपची टीका
जो सदस्य किमान दहा वर्षे पक्षाच्या प्राथमिक सदस्य असेल त्यालाच महासचिव पदाची निवडणूक लढता येईल, अशी दुरूस्ती आता करण्यात आली आहे. जनरल काउन्सिलची बैठक बोलावण्यास पनीरसेल्वम यांनी आक्षेप घेत न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र न्यायालयाने पक्षाच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप करण्यास नकार देत त्यांची मागणी फेटाळली होती. न्यायालयाच्या परवानगीनंतरच काउन्सिलची बैठक घेण्यात आली होती. त्यात पलानीस्वामी यांची अंतरिम महासचिव म्हणून निवड करण्यात आली तर पनीरसेल्वम यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.





