O. Panneerselvam : पन्नीरसेल्वम यांनी सोडली एनडीएची साथ

चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांनी गुरूवारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची साथ सोडली. त्या राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी संबंधित घडामोड घडली. पन्नीरसेल्वम आणि माजी मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्यात काही वर्षांपूर्वी अण्णाद्रमुकमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून संघर्ष झाला.
त्यामध्ये पलानीस्वामी यांनी बाजी मारली. त्यानंतर पन्नीरसेल्वम यांची त्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तसे असूनही ते तमिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या अण्णाद्रमुकमधील एका गटाचे नेतृत्व करतात. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुकने भाजपशी असणारी मैत्री तोडली. त्या निवडणुकीत पन्नीरसेल्वम यांचा गट भाजपचा मित्र बनला.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा बिल्कूल प्रभाव पडला नाही. आता तमिळनाडूतील विधानसभा निवडणूक जवळ येत असताना राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीच पलानीस्वामी यांनी पुन्हा भाजपशी मैत्री केली. त्यापाठोपाठ पन्नीरसेल्वम यांनी भाजपपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच राज्यव्यापी दौरा करून पुढील निर्णय घेणार आहेत. त्यामुळे पन्नीरसेल्वम द्रमुकच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीचा भाग बनणार की सुपरस्टार विजय यांच्या पक्षाशी (टीव्हीके) हातमिळवणी करणार, याविषयीची उत्सुकता बळावली आहे.





