पुणे जिल्हा | ड्रोनच्या घिरट्यानी नागरिक भयभीत

यवत, (वार्ताहर) – दौंड तालुक्यातील वरवंड व पाटस गावच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळेस अवकाशात ड्रोन फिरत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत सतर्क राहून ड्रोन दिसल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडून करण्यात आले आहे.
याबाबत अधिकची माहिती अशीकी, सध्या पाटस वरवंड हद्दीत मोठ्या प्रमाणात दिवसा व रात्रीच्या वेळेत चोऱ्या,घरफोडया यांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या घरफोडीमुळे पोलीस प्रशासन हतबल झाले असून प्रशासनावर मोठा ताण व चोर शोधण्याचा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
आता मात्र रात्रीच्या वेळी पाटस व वरवंड परिसरात रात्रीच्या सुमारास ड्रोन फिरत आहेत. या रात्री घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे येथील नागरिक मात्र पुरते भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी त्यांना जागे राहून पहारा द्यावा लागत आहे.
मात्र, हे ड्रोन कुठून येतात आणि कुठे गायब होतात हे समजत नसल्याने परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांना याबाबत नागरिकांनी सूचना दिल्यावर पोलीस गावा, गावात गस्त घालत आहेत. परंतु ड्रोनचा शोध लागत नसल्याने हे रात्री उडणारे ड्रोन नागरिकांची आणि पोलिसांची दुकेदुखी बनली आहे.
ड्रोन नेमका कोण व कशासाठी उडवत आहे, याच्या साहाय्याने हेरगिरी करून परिसरात चोऱ्या तर होत नाही, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले असून या ड्रोनचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी आता वरवंड व पाटस येथील नागरिकांनी केली आहे.





