Devendra Fadnavis : “चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव” – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis – मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन वरळी येथे एसव्हीपी स्टेडियम, डोम येथे करण्यात आले होते, त्यावेळी फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी रंगभूमी ही जगातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे. छोटा पडदा, मोठा पडदा, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांत मराठी कलावंतांनी अप्रतिम योगदान दिले आहे. केवळ कलावंतच नाही तर पडद्यामागे काम करणाऱ्या सर्वांचा मनापासून गौरव व्हावा, हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गजलगायक भीमराव पांचाळे यांना “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पद्मश्री काजोल देवगण यांना स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024, पद्मभूषण अनुपम खेर यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024, अनिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 आणि निर्माते महेश मांजरेकर यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईत चित्रीकरणासाठी नि:शुल्क परवानगी :
मुंबईतील कोणत्याही लोकेशनवर चित्रीकरणासाठी परवानगी आता नि:शुल्क दिली जाणार आहे. तसेच राज्यातील विविध चित्रपट निर्मिती स्थळांवर सुलभ दरात सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
मराठी चित्रपटांचे जागतिक पातळीवर प्रमोशन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच ‘एफएम’ रेडिओवर मराठी गाणे व कार्यक्रमांसाठी ठराविक वेळ देण्याबाबत एफएम रेडिओ चॅनेल्सशी चर्चा केली असून त्यासाठी पुरस्कार योजना देखील जाहीर केली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.





