विद्येच्या माहेरघरात नक्की चाललंय तरी काय??? शाळकरी मुलांच्या हातात चक्क सिगारेट

वारजे – व्यसनांचा विळखा किती मोठ्या प्रमाणात घट्ट होतो आहे, ते पहाणे आजच्या पिढीच्या हाती आहे, असे वाटायला लागले आहे. वारजे येथील पाॅप्युलरनगर येथील सोसायटीमध्ये किमान चौथी पाचवीच्या वयोगटातील मुले चक्क धुम्रपान करताना आढळली असून त्यांचा व्हिडीओ काढण्यात आलेला आहे. तेही व्यसननुक्तीच्या दिवशी!
एका खासगी शाळेजवळच हा प्रकार घडला असून, लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गणवेशातील ही शाळकरी मुले धुम्रपान करताना दिसून येत आहेत. ही मुले घोळक्याने एका इमारतीजवळ उभी असताना सोसायटीमधील सदस्यांनी या मुलांच्या हालचाली टिपल्या. त्यामध्ये एका मुलाने आपल्या खिशातून सिगारेट काढली आणि ती सराईतपणे पेटवली. त्याच्याच शेजारी असलेल्या आणखी एका युवकानेही तसाच प्रकार केला. हे सर्व पहात असताना, आदर्श संस्कारांचा पगडा असलेले पुणे शहर हेच का, असा प्रश्न पडल्यावाचून राहिला नाही.
संबंधित शाळेने या विद्यार्थ्यांबाबत काय धोरण राबवावे, आणि या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यावर काय कारवाई करावी, हा अखेर कायद्याशी निगडीत प्रश्न आहे. मात्र इथे तर अल्पवयीन मुलेच व्यसन करत असताना, भारतीय तंबाखुविरोधी मोहिमेचा फज्जा उडाल्याचेच चित्र दिसून येत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन केल्याबद्दल त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.





