पुणे : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा करण्यात येईल, अशी घोषणा राज्य सरकार करण्यात आली होती. त्याप्रमाणे हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजेनचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होयला लागल्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली होती. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाल्या चित्रा वाघ? महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आणि बारामतीच्या मोठ्ठ्या ताईंची पोटदुखी पुन्हा समोर आली. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेले बघवत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. मोठ्ठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोटं मोडत बसा. या योजनेबाबत त्यांनीच काय तर महाबिगाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरु केला आहे. खरे तर, या योजनेचे खुल्या दिलाने त्यांनी स्वागत करायला हवे होते. मात्र, त्यांनी आपली विकृत मनोवृत्ती दाखवून दिली अशी टीका चित्रा वाघ यांनी केली. काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? माझ्या बहिणींना विनंती करते, तुम्ही पटकन बँकेतून पैसे काढून घ्या. कारण का तर भारतीय जनता पक्षाचे दोन-दोन लोक म्हणत आहेत की, आम्ही पैसे परत घेऊ. ज्यांच्या अकाऊंटला पैसे आले, अशा सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे की, पैसे काढून घ्या. या सरकारचे काही सांगता येत नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली होती.