China Open 2024 : सबलेन्का-ओसाकाची आगेकूच कायम तर जेसिका पेगूलाला पराभवाचा धक्का…

China Open 2024 : – बेलारूसच्या आर्यना सबलेन्का व जपानच्या नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना चायना ओपन टेनिस स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. यूएस ओपन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या जेसिका पेगूलाला पराभवाचा धक्का मिळाल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
बेलारूसच्या आर्यना सबलेन्काने हार्डकोर्टवर खेळताना चायना ओपन स्पर्धेत सलग 14 व्या विजयाची नोंद केली. तिने अमेरिकेच्या ऍशलिन क्रूगरला 6-2, 6-2 असे पराभूत केले. वर्षाच्या सुरुवातीला सबलेन्काने ऑस्ट्रेलियन ओपन व सिनसिनाटी ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आजच्या लढतीत सबलेन्काने दोन्ही सेट अतिशय सहज जिंकले.
राउंड ऑफ 16 मध्ये सबलेन्कासमोर अमेरिकेच्या मॅडिसन कीजचे आव्हान असणार आहे. अमेरिकेच्या मॅडिसन कीजने 2020-21 च्या हंगामात सलग 15 विजयाची नोंद केली होती. त्यामुळे मॅडिसन कीजचा पराभव करून तिच्याच विक्रमाची बरोबरी करण्याची संधी सबलेन्काकडे असणार आहे. स्पर्धेत कीजने ब्राझीलच्या बीट्रिस हदाद माईयावर 6-3,6-3 असा विजय मिळविताना आगेकूच केली होती.
जागतिक क्रमवारीत सध्या73 व्या स्थानावर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाने नवीन प्रशिक्षक पॅट्रिक मौराटोग्लूसह विजयी मालिका कायम राखली. तिने राउंड ऑफ 32 मध्ये अमेरिकेच्या केटी व्हॉलिनेट्सला 6-3, 6-2 असे पराभूत करताना आगेकूच कायम राखली आहे. दोन्ही सेटमध्ये नाओमीने सकारात्मक खेळ करताना, केटीवर वर्चस्व राखले. आता, राउंड ऑफ 16 मध्ये तिच्यासमोर जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणाऱ्या अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान असणार आहे. यापूर्वी नाओमी व कोको या दोन्ही 4 वेळेस आमनेसामने आल्या असून दोघींनी 2-2 अशी बरोबरी साधली आहे. कोको गॉफने ग्रेट ब्रिटनच्या केटी बोल्टरला 7-5, 6-2 असे पराभूत करून आगेकूच केली आहे.
China Open 2024 : उपांत्य फेरीच्या लढतीत अल्काराझ समोर मेदवेदेवचे आव्हान …
जेसिका पेगूलाला पराभवाचा धक्का
जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या पॉला बडोसाने जागतिक क्रमवारीत दुसरया स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या जेसिका पेगूलाला पराभूत करताना चायना ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आठव्यांदा प्रवेश केला आहे. पॉलाने जेसिकाला 6-4, 6-0 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये जेसिकाने 3-1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र पॉलाने आपला खेळ उंचावताना पुन्हा जेसिकाला पुनरागमनाची संधी दिली नाही. बडोसासमोर पुढील फेरीत 35 वर्षीय चिनी खेळाडू झांग शुईचे आव्हान असणार आहे.





