Typhoon Bebinca : चीनला आता बेबिंका वादळाचा धोका

बँकॉक – यागी वादळामुळे चीनमध्ये मोठे नुकसान झाल्यानंतर आता आणखी एका वादळाचा धोका चीनसमोर उभा आहे. बेबिंका हे वादळ चीनच्या मुख्य भूमीवर उद्या (सोमवारी) सकाळपर्यंत थडकण्याची शक्यता आहे.
या वादळामुळे शांघाय विमानतळावरील शेकडो विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बेबिंका चीनच्या आग्नेय प्रदेशांना धडकेल आणि काही नद्यांच्या पाण्याची पातळी दोक्याच्या पातळीपेक्षा जास्त जाण्याचा अंदाज आहे.
बेबिंका या टायफूनमुळे झालेल्या जोरदार पावसाच्या इशाऱ्यांदरम्यान पूर्वेकडील बंदरावर जहाजे परत बोलावली जात आहेत आणि पूर आणि संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवले जाते आहे. रात्रीपर्यंत या वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी १५१ किलोमीटर इतका होण्याची शक्यता आहे, असे चीनच्या हवामान संस्थेने म्हटले आहे.
खबरदारी म्हणून शांघाय प्रांतातल्या एका जिल्ह्यातून ९ हजार लोकांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. जवळच्या झौशान शहरात, रेस्टॉरंट्स, सुपरमार्केट आणि दुकाने दिवसा लवकर बंद झाली आणि सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.
या वादळामुळे पूर्व किनारपट्टीच्या बागांमध्ये तब्बल १० इंच इतका प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. जलसंपदा मंत्रालयाने शनिवारी शांघाय आणि जिआंग्सू, झेजियांग आणि अनहुई प्रांतांमध्ये पूरस्थितीसाठी श्रेणी-४ आपत्कालीन प्रतिसाद सुरू केली आहे.
फिलीपिन्समध्ये बेबिंका या उष्णकटिबंधीय वादळाच्या तडाख्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून किमान दोन जण बेपत्ता आहेत. या वर्षीच्या जानेवारीपासून फिलीपिन्समध्ये आलेले हे सहावे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे.
जवळपास ३०० गावांतील दोन लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. फिलीपिन्समध्ये दरवर्षी सरासरी २० वादळे येतात. यामुळे मोठे पूर, भूस्खलन आणि इतर अत्यंत गंभीर नैसर्गिक आपत्ती उद्भवतात.





