Pune District : लहान वयातच मुलांवर क्रीडा संस्कार केले पाहिजेत

इंदापूर : लहान मुलांच्या आरोग्यसाठी तसेच त्यांच्या शाररिक बळकटीसाठी, त्यांची टीव्ही मोबाईलची सवय बंद केली पाहिजेत. जास्तीत जास्त त्यांचे मन खेळाकडे वळविले पाहिजेत. त्याशिवाय मुलांचे आरोग्य चांगले राहणार नाही. भविष्यात या मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, लहान वयातच मुलांवर क्रीडा संस्कार करणे गरजेचे आहे, असे मत इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट्स अकॅडमी व आंतरराष्ट्रीय कुराश पंच दत्तात्रय व्यवहारे यांनी केले.
इंदापूर शहरातील शहा ग्लोबल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन शनिवारी (दि. 7) करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धेची सुरुवात माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त वैशाली भरत शहा, शहा ग्लोबल स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक अंगद शहा, संचालिका रुचिरा शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय पंच दत्तात्रय व्यवहारे बोलत होते. यावेळी स्कूलमधील विद्यार्थांनी उत्कृष्ट पथसंचलन केले. तसेच प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांनी वै. नारायणदास शहा, वै. विठ्ठलदास शहा, वै. गोकुळदास शहा, वै. सुरेशदास शहा यांच्या प्रतिमांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर क्रीडा महोत्सवाला सुरवात करण्यात आली. यावेळी नर्सरी ते सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळात सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थांनी फ्रॉग जंप, अनिमल मॅच, लेमन स्पून, टग ऑफ वॉर, रिले, म्यूजिक चेअर, हर्डल रेस, जेली फिश स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांनी माती संरक्षण दिनी बनविलेल्या विविध वस्तूंचे कला प्रदर्शन लावण्यात आले होते. शहा ग्लोबल स्कूलचे क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ऋतुजा महाजन, शिक्षिका रिटा शुक्ला, कल्याणी यादव, संध्या यादव, श्रुतिका खटावकर, विद्या दरेकर, राजश्री पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेत बालक व पालकांचा सहभाग
मुलांमध्ये आणि पालकांमध्ये संवाद व्हावा, त्यांचे नाते दृढ आणि सकारात्मक व्हावे यासाठी, शहा ग्लोबल स्कुलच्या वतीने, क्रीडा महोत्सवात बालक आणि पालक अशी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जलद गतीने बालकांची शाळेची बॅग भरणे, ग्लासांचे मनोरे तयार करणे, सर्कल जोडणी करणे असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये बालकांच्या पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आनंद लुटला. त्यामुळे क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.





