‘कॉपीराइट’मुळे बालभारती मालामाल

एका निर्णयामुळे दोन वर्षांत तब्बल सव्वाचार कोटी रुपयांचा फायदा
व्यंकटेश भोळा
पुणे – शिक्षण विभागाने “बालभारती’च्या पाठ्यपुस्तकांवर कॉपीराइट घेण्याचा निर्णयाने आता खासगी पुस्तक प्रकाशकांना चाप बसत आहे. या प्रकाशकांना मार्गदर्शक पुस्तके, गाइड्स प्रकाशित करण्यासाठी “बालभारती’कडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यांच्या आर्थिक उलाढालीवरून शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. कॉपीराइटमुळे “बालभारती’ला गेल्या दोन वर्षांत तब्बल सव्वा चार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
राज्यातील शालेय शिक्षणाच्या सर्व पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीची जबाबदारी “बालभारती’कडे आहे. पाठ्यपुस्तकांची छपाई करतानाच अनेक खासगी प्रकाशने बालभारतीच्या पुस्तकांची नक्कल करून गाइड, व्यवसाय अशा विविध स्वरुपात बाजारात आणतात. या संस्था “बालभारती’च्या मजकुरात थोडा फेरफार करून बाजारात विक्री करून पैसे कमावतात. याचा बालभारतीला कोणताही फायदा होत नाही. या सर्वांचा विचार करता राज्य शासनाने बालभारतीच्या पुस्तकांवर कॉपीराइट घेण्याचा निर्णय घेतला.
बालभारतीच्या कोणत्याही पाठ्यपुस्तकातील मजकूर वापरायचा असल्यास प्रकाशकांना नोंदणी आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. नोंदणीनंतर त्यांना अधिकृत “टायटल’ दिले जाते. त्यानंतरच त्यांना पुस्तके, गाइड बाजारात आणण्यास मुभा आहे. मात्र, ज्या प्रकाशकांची वार्षिक उलाढाल 15 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना कोणतेही शुल्क नाही. परंतु त्यापेक्षा जास्त उलाढाल असल्यास त्या रकमेवर शुल्काचा टप्पा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार बालभारतीकडे शुल्क भरावे लागेल. त्यामुळे आता कॉपीराइटच्या नोंदणीसाठी प्रकाशकांची संख्या वाढत आहे.
“त्या’ प्रकाशकांवर कारवाईचा बडगा
बाजारात गाईड्स येतात, ती बालभारतीच्या पुस्तकाच्या आधारावर असतात. त्यामुळे असे गाइड्स छापण्यापूर्वी कॉपीराइट ऍक्टनुसार प्रकाशकांना बालभारतीची परवानगी आवश्यक आहे. परवानगी न घेता मार्गदर्शक पुस्तके प्रकाशित करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तशा काही नोटीसही संबंधितांना पाठवल्याचे बालभारतीने सांगितले आहे.
गतवर्षी कॉपीराइट अंतर्गत गतवर्षी 73 प्रकाशकांनी नोंदणी केली. त्यातून बालभारतीला 1 कोटी 22 लाख रुपये प्राप्त झाले. यंदा 84 प्रकाशकांनी नोंदणी केली असून, त्याद्वारे 2 कोटी 95 लाख रुपये मिळाले आहेत. परंतु राज्यभरात असणाऱ्या प्रकाशकांची संख्या पाहता नोंदणीसाठी आणखी प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.
– विवेक गोसावी, संचालक, बालभारती.





