Child Marriage : आसाममध्ये २४ तासांत ४१६ जणांना अटक; बालविवाहविरोधात मोठी कारवाई !

Child Marriage – आसाम सरकारने बालविवाहाविरोधातील कारवाई तीव्र केली असून राज्यात बालविवाहाविरोधातील कारवाईच्या तिस-या टप्प्यात २४ तासांत ४१६ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई २१-२२ डिसेंबरच्या रात्री सुरू करण्यात आली होती, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी रविवारी दिली. याप्रकरणी पोलिसांनी ३३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत माहिती दिली. सरमा म्हणाले, ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलत राहू. राज्य सरकारने २०२३ मध्ये फेब्रुवारी आणि ऑक्टोबर या दोन टप्प्यांत बालविवाहविरोधी मोहीम सुरू केली होती. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात ४,५१५ गुन्हे दाखल करून ३,४८३ जणांना अटक करण्यात आली होती. तर ऑक्टोबरमध्ये दुस-या टप्प्यात ७१० गुन्हे दाखल करून ९१५ जणांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की, बालविवाह प्रकरणांमध्ये कायदेशीर हस्तक्षेप करण्यावर आसाम सरकारने दिलेला भर आता उर्वरित देशासाठी आदर्श बनला आहे. आसाम सरकारच्या या कायदेशीर धोरणामुळे २०२१-२२ आणि २०२३-२२४ या वर्षांत राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये बालविवाहात ८१ टक्क्यांनी घट झाली आहे.





