मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमुळे महामार्गाची डागडुजी

कापूरहोळ- खेड-शिवापूर ते सारोळा दरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांनी अनेक वेळा मागणी करुनही खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते, परंतु मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा या रस्त्याने येणार असल्यामुळे एका दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे, परंतु मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या रस्ताने जाणार नव्हता तेथील खड्डे मात्र जैसे थे ठेवले आहेत.

पुणे-सातारा महामार्गावर पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मलमपट्टी करण्यात आली आहे. येथील सेवा रस्ता व पुलांची कामे अनेक वर्षांपासून रेंगाळलेली आहेत. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे. प्रशासनाकडे तक्रार करुनही याची दखल घेतली जात नव्हती, परंतु मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार असल्यामुळे रस्त्याची मलमपट्टी करण्यात आली आहे.सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि मुख्यमंत्र्याला वेगळा अशी प्रतिक्रिया नागरिक व प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.