Eknath Shinde | Health Update : राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या 5 नोव्हेंबरला पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. असे असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा आला असल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली असता ते रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर आता डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती कशी आहे आणि ते काम करु शकतात का? याबद्दलची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. त्यासोबतच त्यांचा घशाचा संसर्ग झाला होता. काही चाचण्या करण्यासाठी ते रुग्णालयात आले होते. एमआरआय, एक्स रे करण्यात आला. त्यांना थोडा अशक्तपणाही आला आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट चांगले आहेत. आम्ही रिपोर्टमध्ये काय हे सांगू शकत नाही. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. ते काम करु शकतात. आता ते कामासाठीच गेले आहेत, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होत असताना, एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी निघून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गावी गेल्यानंतर त्यांची प्रकृती तिथे खालावली होती. पण दोन दिवसांनी तेथे विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा ठाण्यात परतले होते. यादरम्यान पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावली. त्यांचा घसा दुखत असल्याने तसेच त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याने त्यांच्यावर उपचार केले आहेत. सतत अँटी बायोटीक दिल्याने अशक्तपणा आल्याने देखील उपचार करावे लागणार असल्याने एकनाथ शिंदे ज्युपिटरमध्ये दाखल झाले आहेत.