Mahayuti : मुख्यमंत्री म्हणतात निवडणूक एकत्र लढू, पण एकनाथ शिंदे अजित पवार ऐकणार का?

Maharashtra Local Body : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती कसे सामोरे जाणार, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्या उपस्थितीत एका वाक्यात सांगून टाकलं. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती एकमताने सामोरे जाईल. परंतु एखाद्या ठिकाणी वेगळे निर्णय घेऊन लढावे लागेल’, असे ते स्पष्ट करण्यास विसरले नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने यांना पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत. आदेशाचे आपण स्वागत करतो असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. चौंडी येथे महायुतीच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीसांनी हे भाष्य केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचा आदेश दिला आहे. आदेशाचे स्वागत करत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. याचबरोबर निवडणूक आयोगाला देखील विनंती करणार, निवडणुकांची तयारी करावी. निवडणुकांमध्ये भाटिया आयोगाप्रमाणेच ओबीसींचे संपूर्ण आरक्षण लागू राहील, असे फडणवीस यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चौंडीत मंत्रिमंडळाची बैठक झाली. अशाच पद्धतीने राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठका घेणार आहे का? यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतच नियमित बैठका होतील. परंतु अहिल्यादेवी यांचा त्रिशताब्दी जयंतीचे पर्व आहे. त्यामुळे हा योग साधून ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. तसंच पुढे काही योग आल्यास अशाच बैठका घेण्याचा प्रयास करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे तिघेही या पत्रकार परिषदेत एकत्रच होते. तेव्हा या दोघांनीही काही वक्तव्य केले नसले तरी अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा अंदाजही गेले काही महिने घेतला जात आहे.
समविचारी पक्षांशी स्थानिक पातळीवर युतीसाठीही चाचपणी सुरू आहे. महायुतीच्या घटक पक्षांमध्येही याच प्रकारे समीकरणे मांडली जात आहेत. त्यातच, गेल्या काही महिन्यांपासून काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर मांडली जाऊ लागली आहे. नेते आणि मंत्रीही परस्परांच्या निर्णय, कृतींवर शेरेबाजी करत आहेत.
काही ठिकाणी पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही. महायुतीतील काही मंत्रीच परस्परांना अलिकडच्या काळात शालजोडीतील लगावून देत आहेत. थेट टीकाही करत आहेत. अशा परिस्थिती फडणवीस यांनी एकत्र लढू, असं जरी म्हंटल असलं तरी ही घोषणा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना कितपत मान्य होईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





