पिंपरी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माऊली चरणी लीन

पिंपरी (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी संस्थान समितीच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्याच्या सुख समृद्धीची माऊली चरणी प्रार्थना केली.
यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानभुमी प्रकल्पासाठी पहिल्या टप्पा 130 कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा तसेच ग्रंथ प्रकाशन ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा छपाईसाठी देहू व आळंदी संस्थानला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, यासाठीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते.





