Pimpri : सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणे महत्त्वाचे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी : जनता ज्याच्या मागे असते, त्याला कशाची भिती नसते. लोकांशी जिव्हाळा गरजेचा असते. आपण काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेलो नाही, त्यामुळे आपल्याकडे सत्ता, पद असताना सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणे महत्त्वाचे असते. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिंचवड येथे केले.
चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शिवसेनेचे उपनेते व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ‘संघर्षयोद्धा’या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी ( दि. 16) उत्साहात पार पडला. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंदगिरी महाराज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिंदे बोलत होते.
त्यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, चिंचवडचे आमदार शंकर जगताप, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, विधान परिषद आमदार अमित गोरखे आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, कार्यकत्यांना जपणे, त्यांना बळ देणे हे नेत्याचे काम असते. कारण, कार्यकर्ताच नेत्याला मोठं करत असतो. आपल्या नेत्याचे ब्रॅडींग करत असतो. त्यासाठी तो आपल्या कुटूंबादेखील पर्वा करत नाही. असा कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असते.
स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले की, सनातन धर्माचे पहिले प्रकाशन म्हणजे अयोद्धेतील प्रभू श्रीराम व धर्माची दुसरी आवृत्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जनतेची, सैनिकांची, शेतकऱ्यांची काळजी कशी घ्यावी, याचे नियम छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितले आहेत. कीर्तनकार, प्रवचनकारांनी भगव्या झेंड्यासाठी आजीवन प्रयत्न करणे हा खरा धर्म आहे. असे ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ म्हणाले की, जे नेतृत्व तळागाळातून तयार होते, त्यांना समाजाच्या शेवटच्या घटकाची काळजी असते. कोणताही राजकीय वारसा नसताना श्रीरंग बारणे यांची कारकीर्द सुरुवात तळागाळातून झाली. बारणे हे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तालमीत तयार झाले असून मावळाच्या जनतेने योग्य प्रतिनिधीला संसदेत पाठविला आहे.





