Chief Justice Bhushan Gavai – न्यायालयीन प्रक्रियेच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने आपण कायम राहू. कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापनेसही आपले संपूर्ण समर्थन असल्याची स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गुरुवारी येथे मांडली. मराठवाड्यातील एखाद्या लहान गावातील गरीब व्यक्तीला मुंबई येथे जाऊन खटला लढणे परवडणारे नाही. तेथे जाणे-येणेही शक्य नाही आणि वकिलांचे शुल्क देणेही आवाक्याबाहेरचे असते. त्याच्यासाठी औरंगाबाद खंडपीठ सर्वच दृष्टीने सोयीचे ठरते. औरंगाबाद येथे खंडपीठ स्थापनेच्याही वेळी विरोध झाला होता. परंतु खंडपीठ स्थापनेचा विश्वास येथील वकील, न्यायाधीशांनी सार्थ ठरवला. आज खंडपीठाने उच्च न्यायालला अनेक मुख्य न्यायाधीश दिले. सरन्यायाधीशही दिले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेचे विकेंद्रीकरण हे घटनेलाही अभिप्रेत आहे, असेही ते म्हणाले. औरंगाबाद खंडपीठ वकील संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात सरन्यायाधिश भूषण गवई बोलत होते. यावेळी न्या. गवई म्हणाले, न्यायमूर्ती हा समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे त्याला समाजातील प्रश्न, समस्या यांचे चांगले आकलन होते व त्यांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते. न्यायाधीशांनी घटनात्मक मूल्यांची बांधिलकी ठेवली तर न्यायदान सुकर होते. न्यायदान ही केवळ नोकरी नसून देशाची आणि समाजाची सेवा करण्याची संधी आहे. खुर्ची हंगामी असते. पण संबंध कायम असतात. माझ्यापेक्षाही अनेक योग्यतेचे न्यायाधीश असून, त्यांना सर्वोच्च पदावर पोहोचता आले नाही. परंतु सर्वच गोष्टी या मनासारख्या होत नाहीत. आपल्याला सरन्यायाधीशपदापर्यंत पोहोचण्यासाठी नियतीची साथ आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाचेही बळ लाभले, असे सांगत न्या. गवई यांनी कॉलेजियमबाबत मत व्यक्त करताना उमेदवाराची जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी हे कधीही निकष आम्ही ठरवत नसून तेथे गुणवत्तेवर आधारित न्यायाधीशांची निवड करण्यावर भर दिल्याचे सांगितले.