Chhatrapati Sambhajiraje : “अजितदादा तुमच्यात हिंमत आणि धमक असेल तर…”; संभाजीराजेंचा थेट इशारा !

Chhatrapati Sambhajiraje | Ajit Pawar : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला 19 दिवस उलटून गेले तरीही अद्याप यातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. यात माजी खासदार छत्रपती संभाजीराजे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारच्या कामकाजावर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे ?
“वाल्मिक कराडला संरक्षण देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला नाही? मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? सरकारने एसआयटी नेमल्यानंतर पुढे काय झालं? या घटनेतील आरोपी कुठे आहेत? एक व्यक्तीला घाबरत आहे, यामागे कोण आहे? आपल्याला बीडला बिहार करायचे आहे का? शोधून काढले तर दोन मिनटं लागतात.
कराडच्या संपर्कात कोण आहे? त्याचे खास सबंध कुणाचे आहे?,” असे सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केले आहेत. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘तुम्ही आता काम करून दाखवा’; अजित पवारांवर साधला निशाणा
“अजितदादा तुम्ही प्रकटपणाने बोलला असाल माझी काम करण्याची पद्धत ही आहे. तुम्ही आता काम करून दाखवा. तुमची हिंमत असेल. तुमच्या धमक असेल तर आता काम करून दाखवा. एक एक वार केलेत. भयंकर वार केलेत. फुले, आंबेडकर यांचं नाव घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?” असा सवाल संभाजी राजे यांनी विचारला.
ही माणुसकीची हत्या…
“स्वत: पंकजा मुंडे यांनी सभेत सांगितलं होतं की, वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही. आज पंकजा मुंडे या देखील या घटनेबाबत जास्त बोलत नाहीत. मग जे बीडमध्ये चाललंय ते तुम्हा दोघांनाही पटतंय का? ही माणुसकीची हत्या आहे. बीडची गुन्हेगारी पाहून मी देखील चकित झालो.
धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड कुठं आहे? हे माहिती नसणं हे न पटणारं आहे. स्वतः धनंजय मुंडे यांच्या हातात बंदूक असलेला एक फोटो मी पाहिला. यामधून तुम्ही जनतेला काय मेसेज देत आहात? या महाराष्ट्रात आपण अशा गोष्टी खपवून घ्यायच्या का? हे आता चालणार नाही,” असेही ते म्हणाले.





