छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबासह परदेशात गेलेल्या बजाजनगरातील उद्योजकाच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला आहे. घरात झोपलेल्या केअरटेकरला पिस्तुलचा धाक दाखवत बांधून ठेवले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील तब्बल साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदीसह रोख रक्कम असा सहा कोटींचा ऐवज लंपास केला आहे.. ही खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक संतोष राधाकिसन लड्डा यांची वाळूज एमआयडीसीमध्ये दिशा ऑटो कॉम्स नावाची कंपनी आहे. त्यांचा बजाजनगर येथे आलिशान बंगला आहे. लड्डा यांचा मुलगा क्षितिज हा अमेरिकेमध्ये शिक्षण घेतो. आपल्या मुलाला भेटण्यासाठी पत्नी आणि मुलासह ७ मे रोजी ते अमेरिकेला गेले. परदेशी जाताना घराकडे लक्ष ठेवण्यासाठी लड्डा यांनी त्यांच्याकडील चालक तथा केअरटेकर संजय कडुबा झळके (रा. वळदगाव) यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. परत येईपर्यंत झळके यांना बंगल्यावर थांबण्यास सांगितले होते. दरम्यान, नेहमीप्रमाणे झळके हे बुधवारी रात्री लड्डा यांच्या बंगल्यातील हॉलमध्ये झोपी गेले. मध्यरात्री बंगल्यात आवाज आल्याने झळके दचकून उठले. तेव्हा समोर हातात पिस्तूल, शस्त्रधारी दरोडेखोर दिसले. काही कळण्याच्या आत त्यांच्या कानशिलावर पिस्तूल लावून गप्प बस नाही तर गोळी घालू, अशी धमकी देत त्यांचे ओढणीने हात-पाय बांधले. त्यानंतर दरोडेखोरांनी बंगल्यातील सर्व खोल्यांचे दरवाजे तोडून झाडाझडती घेतली कपाट, लॉकर फोडून घरातील तब्बल साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदीसह रोख रक्कम असा सहा कोटींचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी लड्डा यांच्या बंगल्यासह आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात दरोडेखोर तब्बल दोन तास बंगल्यात असल्याचे समोर आले. या घटनेचा अधिक तपस पोलीस करत आहेत.