Nashik News – छगन भुजबळांकडून महायुतीची शिस्त मोडण्याचे काम सुरू आहे. खोटे स्वप्न पाहणे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करायचे असते. भुजबळांचे प्रयत्न हे महायुतीच्या विरोधातले आहे. पण भुजबळ साहेब १०० टक्के पालकमंत्री होणार नाहीत. ते पालकमंत्री असताना त्यांचा इतिहास अत्यंत वाईट आहे. कुठल्याही आमदाराला ते निधी देत नव्हते. ते फक्त आपल्या नातेवाईकांना आणि त्यांच्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना निधी देत होते. माझाकडे या संदर्भात पुरावे देखील आहेत, असा आरोप शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी करताना मंत्री छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. महायुती सत्तेत आल्यापासून नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन रणकंदण सुरु आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरुन पायऊतार व्हावे लागल्यानंतर भुजबळांना मंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत, त्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच असावे अशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, त्यांच्या या भूमिकेला शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी जोरादार विरोध केला आहे. आगामी ‘सिंहस्थ’ च्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी मंत्री म्हणून कुंभमेळ्याची बैठक घेतली होती. त्यानंतर आमदार सुहास कांदेंनी त्यांच्यावर विविध आरोप करताना निशाना साधला. यासंदर्भात बोलताना आमदार सुहास कांदे म्हणाले की, भुजबळ साहेबांनी घेतलेल्या बैठकीला काहीही अर्थ नाही. परंतु, कुंभमेळा आला की, भुजबळ साहेबांना त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते ज्या टेंडर नोटीस निघतात त्या दाखवतात. मग भुजबळ साहेबांच्या तोंडाला पाणी येते. कालच्या बैठकीच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी कॉन्ट्रॅक्टर्सला सांगितला आहे की, तुम्ही भुजबळ फॉर्मवर या. माझं काय असेल ते द्या आणि मग तुम्ही टेंडर भरा. ही खरी कॉन्ट्रॅक्टरला हिंट होती, असे म्हणत त्यांनी कुंभमेळ्याचा ‘मलिदा’ खाण्यासाठी भुजबळांची उठाठेव सुरू असल्याचा आरोप केला. ते आमदार तुमच्यासोबत आहेत? भुजबळांनी सात आमदार असल्याने राष्ट्रवादीलाच पालकमंत्रीपद मिळावे असा आग्रह धरला आहे. यावर देखील सुहास कांदे यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत, हे मान्य मात्र, त्या सातही आमदारांचा तुम्हाला पाठिंबा आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.