Chhagan Bhujbal : …तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा भव्य कार्यक्रम आज अत्यंत उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन (Chhagan Bhujbal) असल्याने पक्षाच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा प्रसंग अत्यंत भावूक आणि संवेदनशील होता.

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा भव्य कार्यक्रम आज अत्यंत उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन (Chhagan Bhujbal) असल्याने पक्षाच्या सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांसाठी हा प्रसंग अत्यंत भावूक आणि संवेदनशील होता.
या विशेष कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. व्यासपीठावरून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला, मात्र ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे भाषण आणि त्यांनी सादर केलेली शेरोशायरी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. त्यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच एका धगधगत्या शेरोशायरीने केली. “सफर मुश्किल था, मगर हौसलो ने साथ निभाया, हर तुफान से लढकर हमने कारवा बनाया! ये विरासत यूही नही मिलती साथीयों, कई लोगों ने अपना सबकुछ दाव पर लगाया!” या शब्दांत त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासूनचा खडतर प्रवास मांडला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या २७ वर्षांत असंख्य कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी या पक्षाच्या उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतरचा काळ आठवताना त्यांनी भाजप नेते प्रमोद महाजन यांचा एक दाखला दिला. महाजन यांनी विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला आणि निवडणुका झाल्या, मात्र त्यापूर्वी अवघे सहा महिने आधीच विधानसभा स्थापन झाली होती.
जर ते सहा महिने आपल्याला अधिक मिळाले असते, तर राज्याचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच झाला असता, अशी आठवण सांगत त्यांनी यापूर्वी अजितदादांनीही हीच खंत व्यक्त केल्याचे नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीवर बोलताना भुजबळ यांनी स्पष्ट केले की, हा केवळ एक राजकीय पक्ष नसून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारी एक सर्वसमावेशक आणि धर्मनिरपेक्ष सामाजिक संस्था आहे. आज या पक्षाचा एका छोट्या अंकुरापासून विशाल वटवृक्ष झाला आहे. परंतु, हा वटवृक्ष उभा राहिलेला पाहत असताना आज त्याचे मुख्य शिल्पकार अजितदादा आपल्यात नाहीत, याचे अतीव दुःख त्यांनी व्यक्त केले.
अजितदादांचे पक्षासाठीचे योगदान सर्वात मोठे होते आणि त्यांनी अहोरात्र कष्ट करून हा पक्ष वाढवला, त्यामुळे त्यांचे हे अपूर्ण राहिलेले काम आता आपल्यालाच पुढे न्यायचे आहे, अशी भावनिक साद त्यांनी कार्यकर्त्यांना घातली. प्रत्येकाला आयुष्यात संधी मिळते, पण त्या संधीचे सोने करायचे की माती, हे सर्वस्वी आपल्याच हातात असते, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
पक्षांतर्गत शिस्तीवर आणि एकजुटीवर भर देताना छगन भुजबळ यांनी अत्यंत कडक शब्दांत सुनावले की, या जगात पक्षापेक्षा मोठे कोणीही नाही, हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवले पाहिजे. वेगवेगळ्या खेळांचे दाखले देत राजकारणात अंतर्गत चढाओढ लावणाऱ्यांना टोला लगावताना ते म्हणाले की, खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका.
पक्ष म्हणजे केवळ हातातील झेंडा, ऑफिस किंवा त्यावर लावलेला बोर्ड नसतो, तर पक्ष हा कार्यकर्त्यांचा एक मोठा जिवंत समूह असतो. ज्या निष्ठा आपण सर्वांनी आजवर अजितदादांच्या चरणी प्रामाणिकपणे वाहिल्या होत्या, त्याच सर्व निष्ठा आता सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या करायच्या आहेत, असे आवाहन त्यांनी केले.
भाषणाच्या उत्तरार्धात त्यांनी राजकारणातील पदांच्या तात्पुरत्या स्वरूपावर मार्मिक भाष्य केले. राजकीय जीवनात मतभेद असू शकतात, पण मनात कधीही मनभेद निर्माण होऊ देता कामा नयेत, असे ते म्हणाले. सत्ता आणि पदांबद्दल बोलताना त्यांनी “पदं ही अळवावरच्या पाण्यासारखी असतात, ती कधी हातातून निसटून जातील हे सांगता येत नाही,” असे सांगत कार्यकर्त्यांनी पदांमागे न धावता मनाने जिवंत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.
संघर्ष हाच आपला खरा वारसा असून समर्पण ही आपली ओळख बनली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. आपल्या भाषणाचा शेवट करताना भुजबळ यांनी पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण करणारी शायरी पेश केली:
“ना मंजिल से डरेंगे ना रास्तों से हारेंगे
कितने भी तुफान आए जिंदगी में गिरकर भी संभलते रहेंगे
हम राष्ट्रवादी का झेंडा लेकर चले थे आखिरी सांस तक लेकर चलेंगे…”
भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या या शायरीने आणि जोशपूर्ण भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण केला असून, अजितदादांच्या पश्चात पक्ष नव्या दमाने पुढे नेण्याचा निर्धार या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.






