शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला असून, त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील गुप्त चर्चा, शरद पवार यांच्या राजीनाम्यामागील कारणे आणि अजित पवार यांच्या २०१९ च्या शपथविधीमागील पार्श्वभूमी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
शरद पवार आणि पक्ष बांधणी –
शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या भुजबळ यांना पक्ष कुणाचा, शरद पवारांचा की अजित पवारांचा, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भुजबळ म्हणाले, “पवारसाहेबांनी या वयातही शारीरिक व्याधी असताना माझ्यापेक्षा जास्त मेहनत घेतली. १९९९ मध्ये पक्ष स्थापनेवेळी पवारसाहेब आणि माझी दोन हेलिकॉप्टर्स फिरत होती, तेव्हा आम्ही पक्ष बांधला.” ते पुढे म्हणाले, “पवारसाहेबांचे योगदान मोठे आहे, पण अजितदादाही सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, जे मला शक्य नाही.”
२०१४ च्या गुप्त चर्चांचा खुलासा –
भुजबळ यांनी २०१४ मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत सांगितले की, दिल्लीतून काँग्रेस आणि शिवसेना सोडण्याची ऑफर आली होती. “काँग्रेस सोडा, आम्ही शिवसेना सोडतो, वेगवेगळे लढू आणि नंतर तुम्ही मंत्री व्हा, असे सांगितले गेले. आम्ही काँग्रेस सोडली, पण दोन महिन्यांनी शरद पवार यांनी अलिबागला स्पष्ट केले की, ते भाजपला कायमचा पाठिंबा देणार नाहीत,” असे भुजबळ म्हणाले.
अजित पवारांच्या शपथविधीमागील रहस्य –
२०१९ च्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींवर बोलताना भुजबळ म्हणाले, “अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्या, पण मला त्याबाबत काही माहिती नव्हती. अजितदादांनी मला ‘मी अजित पवार आहे, माझा शब्द आहे, आम्ही पूर्ण करू,’ असे सांगितले. त्यानंतर सकाळी ८ वाजता त्यांनी शपथ घेतली. हा सगळा प्रकार माझ्या अपरोक्ष घडला.” त्यांनी पुढे सांगितले की, भाजपला शिवसेना सरकारमध्ये नको होती, म्हणून त्यांनी राष्ट्रवादीला सामावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वळले.
शरद पवारांच्या राजीनाम्यामागील गोष्ट –
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घटनेवर भुजबळ म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये असताना मी पंतप्रधान मोदींविरोधात कडक भाषणे देत होतो. त्याचवेळी पक्षात अंतर्गत चर्चा सुरू होत्या. पवारसाहेबांनी राजीनामा दिला, तेव्हा सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करून पक्ष पुढे नेण्याचे ठरले होते. पण तीन दिवसांनी पवारसाहेबांनी माघार घेतली. या सगळ्या चर्चा अजित पवारांच्या घरी ठरल्या होत्या, पण मला त्यात सहभागी केले गेले नाही.”
भुजबळांचा नाराजीचा सूर –
२०१९ मध्ये अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन शपथ घेतली, तेव्हा भुजबळांना विश्वासात घेतले गेले नव्हते. “देवेंद्र फडणवीस पॅनिक झाले होते, त्यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेतले. या सगळ्या चर्चांबाबत मला माहिती नव्हती. २०१७ मध्येही एका उद्योगपतीच्या घरी चर्चा झाल्या, तेव्हा शिवसेना-भाजप सरकार होते, पण मला त्यात सामावून घेतले गेले नाही,” असे भुजबळ यांनी सांगितले.





