Norway Chess 2022 : कार्लसनवर मात करत आनंद पुन्हा आघाडीवर

नवी दिल्ली – भारताचा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू विश्वानाथन आनंद याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक अव्वल मानांकित ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याचा क्लासिकल विभागाच्या पाचव्या फेरीत पराभव केला. या विजयाच्या जोरावर आनंद याने क्रमवारीत पुन्हा एकदा अग्रस्थान मिळवले.
आनंदने नॉर्वेचा स्टार कार्लसनला ब्लिट्झ प्रकारात पराभूत केल्यानंतर लगेचच क्लासिकल गटातही अवघ्या 40 चालीत बरोबरी साधली होती. त्यानंतर आनंदने अर्मगेडनमध्ये कार्लसनचा पराभव केला. आनंदचे 10 गुण झाले असून या स्पर्धेच्या अद्याप चार फेऱ्या बाकी आहेत.
आनंदने क्लासिकल गटात फ्रान्सच्या मॅक्सिमी वचियर लाग्राव्हे, बल्गेरियाच्या व्हेसिलिन टोपालोव व चीनच्या हाओ वॅंग यांचा पराभव करत सलग तीन विजय मिळवले होते. मात्र, चौथ्या फेरीत अमेरिकेच्या विस्लेकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्याने आघाडी गमावली होती. मात्र, पुन्हा कार्लसनचा पराभव करत त्याने आघाडी घेतली आहे.





