World Chess Championship 2024 : भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 मध्ये जागतिक चॅम्पियन डिंग लिरेनचा मायदेशात सामना करू शकणार नाही. सिंगापूरने यजमानपदाचे हक्क जिंकले असून, भारताच्या या स्पर्धेच्या यजमानपदाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. फिडे (FIDE) ने सोमवारी जागतिक चॅम्पियनशिपचे यजमानपद सिंगापूरकडे सोपवण्याची घोषणा केली. हा सामना 20 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
गुकेश दिल्ली किंवा चेन्नईमध्ये हा सामना खेळू शकणार नाही कारण भारतातील ही दोन्ही शहरे सिंगापूरपेक्षा मागे राहिले. तामिळनाडू सरकार आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF) ने जागतिक बुद्धिबळ संस्था फिडे (FIDE) कडे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतंत्र बोली सादर केली होती, मात्र त्यांना अपयश आले.
फिडे (FIDE) ने सांगितले की, सिंगापूर चेस फेडरेशनने, सिंगापूर सरकारच्या पाठिंब्याने, फिडे (FIDE) वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच 2024 चे यजमानपद जिंकले आहे. सर्व स्पर्धकांचा आढावा घेऊन, ठिकाणे, सुविधा, कार्यक्रम आणि संधी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने सिंगापूरची निवड केली आहे.
फिडेचे अध्यक्ष अकार्डी ड्वोरकोविच म्हणाले की, “आम्हाला आनंद होत आहे की फिडेच्या इतिहासात प्रथमच जागतिक चॅम्पियनशिप सामना सिंगापूरमध्ये होणार आहे. सिंगापूर हे केवळ सर्वात प्रतिष्ठित जागतिक पर्यटन आणि व्यापार केंद्रांपैकी एक नाही, तर ते अनेक प्रतिभावंतांचे समृद्ध बुद्धिबळ केंद्र देखील आहे. मी दिल्ली आणि चेन्नईचे आभार मानू इच्छितो जे यजमानपदाच्या शर्यतीत होते आणि त्यांनी बोली लावली होती.
कैंडिडेट्स टूर्नामेंट जिंकून मिळवली होती पातत्रा…
भारताच्या 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेशने एप्रिलमध्ये टोरंटो येथे खेळल्या गेलेल्या कैंडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा (Candidates Chess Tournament ) जिंकून इतिहास रचला होता. यासह तो 40 वर्षांपूर्वी महान गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडून जागतिक विजेतेपदासाठी सर्वात तरुण आव्हानवीर ठरला. गुकेश हा कैंडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा (Candidates Chess Tournament ) जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. जगज्जेत्याला आव्हान देण्यासाठी कैंडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा (Candidates Chess Tournament ) आयोजित केली जाते आणि अशाप्रकारे गुकेशचा लिरेनशी सामना निश्चित झाला.