Chess Olympiad 2024 : बुद्धिबळ ऑलिम्पियाड ट्रॉफी झाली गहाळ, भारताला (AICF) मागावी लागली माफी; पोलिसात तक्रार दाखल…

All India Chess Federation, FIDE & Nona Gaprindashvili Cup : ऑल इंडिया चेस फेडरेशनने (AICF) बुद्धिबळ ऑलिम्पियाड ट्रॉफी गहाळ झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 2022 मध्ये भारतीय संघाने ही ट्रॉफी जिंकली होती. ही ट्रॉफी हरवल्यानंतर AICF ला या ट्रॉफीच्या प्रतिकृतीची व्यवस्था करावी लागली आणि घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी लागली आहे.
ही एक रोलिंग (फिरती) ट्रॉफी आहे. ही ट्रॉफी 2022 पासून भारताकडे होती. सध्या भारतीय पुरुष बुद्धिबळ संघ बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या 45 व्या ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या जवळ पोहोचला आहे, त्याचवेळी गतविजेत्या भारताकडूनच ही ट्रॉफी हरवल्याची धक्कादायक गोष्ट उघडकीस आली आहे.
एआयसीएफच्या सूत्रांनी ट्राफी गहाळ झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खुल्या आणि महिला विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाला जी ट्राफी देण्यात येते. ती ‘गॅप्रिंडाशिवली ट्रॉफी’ गहाळ झाली आहे. भारत या ट्रॉफीचा गतविजेता आहे. भारताने 2022 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती.
Nona Gaprindashvili Cup won by Team India at Chess Olympiad 2022 is missing as per All India Chess Federation (AICF).
India had won this trophy as a best contingent in 2022
It was discovered after FIDE had asked for the trophy to be brought to Budapest, Major embarrassment 🤦 pic.twitter.com/YtzutqRnAN
— The Khel India (@TheKhelIndia) September 21, 2024
एआयसीएफचे उपाध्यक्ष अनिल कुमार रायजादा यांनी पीटीआयला सांगितले की, “ही ट्राफी गहाळ होऊन एका महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजेच FIDE ने ही ट्रॉफी बुडापेस्टला आणायची विनंती केली तेव्हा ही ट्रॉफी गहाळ झाल्याचे (हरवणे) आमच्या लक्षात आले.”
ते पुढे म्हणाले की, “फिडेने ट्रॉफी परत पाठवण्याबदल विनंती मिळाल्यानंतर, आम्ही 30 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला तरी तिचा शोध घेऊ शकलो नाही, त्यानंतर आम्ही अधिकृत पोलिस तक्रार दाखल केली असून याप्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.”
एआयसीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “FIDE च्या विनंतीनंतर आम्ही ट्राफी सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही आतापर्यंत ती शोधण्यात अक्षम ठरलो आहोत. ही खरोखरच लाजिरवाणी बाब असून या गोष्टींची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. सध्यातरी मूळ ट्राफीची प्रतिकृती मागविण्यात आली आहे. ती मूळ ट्रॉफीइतकी खास नसेल. पण तरीही ती मूळ ट्रॉफीसारखीच असेल. या चुकीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.”
Chess Olympiad 2024 (9th Round) : महिला संघाने अमेरिकेशी व पुरुषांनी उझबेकिस्तानशी साधली बरोबरी…
दरम्यान, ऑलिम्पियाडचा सध्याचा टप्पा 10 सप्टेंबरला सुरू झाला आणि 23 सप्टेंबरला संपणार आहे. नवव्या फेरीच्या लढतीमध्ये भारतीय महिला संघाने अमेरिकेसोबत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. आजच्या बरोबरीने भारताचे 15 गुण झाले आहेत. सुवर्णपदक मिळविण्यासाठी शेवटच्या दोन फेरीत विजय मिळविणे आवश्यक आहे. महिला संघासमोर पुढील फेरीत चीन संघाचे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे खुल्या गटात भारतीय पुरुष संघाने गतविजेत्या उझबेकिस्तानशी बरोबरी साधली. सलग आठ विजयानंतर नवव्या फेरीतही भारताने विजय मिळवला असता तर सुवर्णपदक निश्चित झाले असते. पुरुष गटात भारताचे आता १७ गुण झाले असून अमेरिका, उझबेकिस्तान व चीन १५ गुणांसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे.





