प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर चास कमान धरणातील हुतात्मा राजगुरु जलाशयात नवीन लाँच दाखल झाली असून, या लाँचचे लोकार्पण माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लाँच उपलब्ध झाल्याने वाडा-साकुर्डी व परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला आहे.चास कमान धरणामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील वाडा परिसर दोन भागांत विभागला गेला आहे. धरण होण्यापूर्वी एकमेकांवर अवलंबून असलेली वाडा, साकुर्डी, कहू, कोयाळी, माजगाव, देवोशी, औदर, चिखलगाव आदी गावे व वाड्यावस्त्या पाणीसाठ्यामुळे वेगळ्या पडल्या. परिणामी जून ते एप्रिल या कालावधीत नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. लाँच नसल्यामुळे नागरिकांना जीवघेणा होडी प्रवास करावा लागत होता. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, दूधवाले तसेच रुग्ण यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात हा प्रवास अधिक धोकादायक ठरत होता. होडी प्रवासाच्या भीतीमुळे अनेक विद्यार्थिनींनी वाडा येथे शिक्षणासाठी जाणे टाळल्याचीही उदाहरणे होती.या मूलभूत प्रश्नाकडे पुणे जिल्हा परिषदेकडून दीर्घकाळ दुर्लक्ष झाले होते. मात्र साकुर्डी, वाडा व परिसरातील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नवीन लाँच जलाशयात दाखल झाली. गेली दोन वर्षे लाँच येणार अशी आश्वासने मिळत असतानाच नागरिकांना मात्र होडीने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता.नवीन लाँच सुरू झाल्याने वाडा-साकुर्डी परिसरातील नागरिकांना सुरक्षित, जलद व स्वस्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सुलभ होणार असून रुग्णांना दवाखान्यात वेळेत पोहोचवणे शक्य होणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ व प्रवास खर्चही वाचणार असून स्थानिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. रविवारी (दि. 21) रात्री लाँच जलाशयात दाखल झाल्यानंतर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लोकार्पण व पूजनप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, युवासेना तालुका प्रमुख मृण्मय काळे, साकुर्डीच्या सरपंच रोहिणीताई गवारी, माजी सरपंच कुंदाताई कडू, शिवाजी मोरे, जाकीर तांबोळी, संदीप घनवट, चास सरपंच विनायक मुळूक, उल्हास देवदरे, ओंकार गवारी, अक्षय केदारी, ज्ञानेश्वर सुरकुले, गुलाब कडू, सुनील पावडे, लाँच चालक सुधीर ढोकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.