चार धाम यात्रा तात्पुरती स्थगित; ‘या’ दिवशी पुन्हा सुरु होणार यात्रा, वाचा सविस्तर….

नवी दिल्ली – उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मंगळवारपर्यंत चार धाम यात्रा तात्पुरती थांबविण्याचे निर्देश दिले आहेत, यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी जारी केलेल्या आदेशात, उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे की, “उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलनामुळे वाहतुकीच्या हालचालीत व्यत्यय आल्यानंतर चार धाम यात्रा 14 आणि 15 ऑगस्ट रोजी तात्पुरती थांबवण्यात येत आहे.
नैसर्गिक स्थितीचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल आणि त्याची माहिती योग्य वेळेत यात्रेकरूंना दिली जाईल. चार धाम यात्रेमध्ये गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र तीर्थांचा समावेश होतो.
या सर्व ठिकाणी तुफानी पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. 22 एप्रिल पासून गंगोत्री यमुनोत्रीचे दार उघडण्यात आले, केदारनाथचे दरवाजे 25 एप्रिल रोजी तर बद्रीनाथचे दरवाजे 27 एप्रिल पासून उघडण्यात आले आहेत.





