Satara | वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघामध्ये परिवर्तन निश्चित

वाई, (प्रतिनिधी) – कर्तृत्व नसताना फक्त घराणेशाहीच्या नावावर निवडून येणाऱ्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभेच्या आमदाराला आता घरी बसण्याची वेळ आली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांचे नाव घ्यायचे आणि त्यांचेच सत्तेचे विकेंद्रीकरणाचे विचार मोडीत काढून एकाच घरात सगळ्या सत्ता घेऊन जनतेला झुलवत ठेवून झुंडशाही करणाऱ्या विरोधात आता जनताच पेटून उठली आहे.
आता सर्व पक्षातील विरोधकांनी एकच मोट बांधली असून परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला.
खानापूर, ता. वाई येथील संवाद परिवर्तन यात्रेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वाई विधानसभा युवा सेना योगेश फाळके, वाई तालुका उप तालुकाप्रमुख गणेश सावंत, युवासेना वाई तालुकाप्रमुख गणेश पवार, वाई शहर युवा सेना किशोर भगत,
विभाग प्रमुख प्रताप भिलारे, खंडाळा संदीप जाधव ,गणेश महांगडे, तालुका उप तालुकाप्रमुख सचिन धायगुडे, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना संचालक भानुदास जाधव ,ऍड उमेश पवार तसेच विविध गावात गेल्यानंतर तसेच वाई शहर व सर्व भागात शिवसैनिक व प्रमुख मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी खानापूर, पांडे या गावात प्रत्यक्ष जाऊन नागरिक महिला युवक यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वाई ,खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात कोणताही शाश्वत विकास नसताना मोठी बेरोजगारी वाढलेली आहे.
मात्र, विद्यमान आमदार मात्र जननायक म्हणून समाजात मिरवत असले तरी जननायकाचे पितळ तरुणांनीच उघडे पडले आहे. आता तरुण पिढी विद्यमान आमदारांना जाब विचारू लागले आहे. यामुळे गावोगावी अभी नही.. तो कभी नही…! असा नारा तरुणांच्यातून सुरू झाला आहे.





