Satara | मतदारसंघातील गद्दारांना धडा शिकविण्यासाठी मी मैदानात – पुरुषोत्तम जाधव

लोणंद, (प्रतिनिधी) – लोणंद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी साथ द्या, रस्ते पाणी आरोग्य या मूलभूत सुविधांसह मतदार संघात शांततामय सहजीवनासाठी लोणंदवासीयाने पाठीशी उभे रहावे, लोणंदवासी आणि नेहमीच मला भरघोस पाठिंबा दिला आहे यावेळी सुद्धा शंभर टक्के आपण माझ्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन करताना अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी वाई गद्दारांना धडा शिकविण्यासाठीच मी मैदानात उतरलो असून मी अपक्ष असल्याने सर्वच पक्षांचा मला पाठिंबा मिळत आहे, त्यातच मला एका बड्या नेत्याची मोठी ‘पॉवर’ असल्याने माझा मोठा विजय 23 तारखेच्या निकालातच दिसेल, असा सूचक इशारा प्रचारादरम्यान केला.
लोणंद येथे प्रचारासाठी काढलेल्या रॅलीप्रसंगी पुरुषोत्तम जाधव यांनी मतदारांशी संवाद साधला. पुरुषोत्तम जाधव यांना सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ लोणंद शहरातून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. फलटण फाट्यावरून सुरू झालेल्या या प्रचार रॅलीमध्ये भव्य प्रचार रथातून पुरुषोत्तम जाधव यांनी लोणंद शहरातील मुख्य बाजारपेठेतून मोठे शक्ती प्रदर्शन करीत प्रचार रॅली काढली.
लोणंद शहरातील कोपरा सभेत बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात वाई खंडाळा महाबळेश्वर या मतदारसंघाचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्वर्गीय आबासाहेब वीर ,स्वर्गीय प्रतापराव भोसले यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. आणि यशवंत विचार या मतदारसंघात रुजवला. मात्र, सध्या घराणेशाहीने या मतदारसंघाचा घात केला आहे.
परिवर्तन निश्चित..लोणंदवासियांनी साथ द्यावी
सर्व सत्ता एकाच घरात ठेवून यशवंत विचाराला तिलांजली देण्याचे काम सध्या एकच घराणे करत आहे. दुसरा एकही कार्यकर्ता नेतृत्व करण्याच्या लायकीचा नाही का? असा सवाल मतदारसंघातील कार्यकर्ते करत आहेत. आता मतदारसंघाच्या स्वाभिमानासाठी निर्णय लढा देण्याची वेळ आली आहे. तिन्ही तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन निश्चित आहे. आता लोणंदवासियांनी देखील साथ द्यावी, असे आवाहन यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी केले.





